अंबाबाई मंदिरावर सुवर्ण कळस विराजमान; ₹१,५०० कोटींच्या विकास आराखड्यांतर्गत पूर्ण झालेल्या कामांचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार उद्घाटन

7

कोल्हापूर : करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिराच्या मूळ ऐतिहासिक रचनेचे जतन करत भाविकांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अंबाबाई मंदिर परिसरासाठी सुमारे ₹१,५०० कोटींच्या भव्य विकास आराखड्याला मंजुरी दिली असून, या अंतर्गत विविध विकासकामे आता वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहेत. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून आज मंदिरावर भव्य ‘सुवर्ण कळस’ विराजमान करण्यात आला, जो प्रत्येक कोल्हापूरकरासाठी अत्यंत अभिमानाचा आणि सुवर्णक्षण ठरला आहे.

या नूतन सुवर्ण कळसासह विकास आराखड्यांतर्गत पूर्ण झालेल्या विविध अत्याधुनिक कामांचे अधिकृत उद्घाटन केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमितभाई शहा यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. श्रद्धा, परंपरा आणि आधुनिक विकास यांचा त्रिवेणी संगम घडवून आणणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी कोल्हापूरनगरी सज्ज होत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या या महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक कोल्हापूर दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी व सोहळ्याच्या अचूक नियोजनासाठी आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीची विशेष आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत सोहळ्याची भव्यता, प्रशासकीय नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि भाविकांची सोय यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राहुल आवाडे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री प्रकाश आण्णा आवाडे, माजी आमदार चंद्रदीप नरके, समरजीतराजे घाटगे, महापौर रुपाराणी निकम, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शिल्पा खोत यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.