घर, भाकरीची स्वप्ने दाखवून काँग्रेसने गरीबांना फसविले, बिहारमधील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल

काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी अनेक दशके गरिबांना घरे आणि भाकरीची केवळ स्वप्ने दाखवली, तर रालोआ सरकारने चार कोटी गरीबांना कायमस्वरूपी घरे दिली. दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींच्या नावावर काँग्रेस आणि राजदने केवळ स्वतःचे राजकीय हित साधले, तर ‘रालोआ’ ने दलित, मागास आणि वंचितांना हक्क आणि सन्मानाचे जीवन दिले आहे. ज्यांना एका कुटुंबाच्या हातात सत्ता ठेवायची आहे, त्यांना संविधान खटकते, म्हणूनच त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ नयेत, यासाठी एकजूट दाखवून समृद्ध भारतासाठी भाजपा आघाडीला विजयी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये गया व पूर्णिया येथील विशाल प्रचार सभांमध्ये बोलताना केले.

तुमची स्वप्ने हाच आमचा संकल्प आहे, म्हणूनच गेल्या दहा वर्षांत अनेक दशकांच्या समस्या सोडविण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले, असेही ते म्हणाले. भारत हा अनेक भाषा, बोली, चालीरीती, पोशाख, अनेक धर्म आणि पंथांनी नटलेला देश आहे, अशा परिस्थितीत संविधान हीच देशाच्या उज्ज्वल भविष्याची पवित्र व्यवस्था आहे. भारत समृद्ध व्हावा, असे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते, पण देशावर अनेक दशके राज्य करणाऱ्या काँग्रेसने संधी आणि देशाचा वेळ गमावला, अशा शब्दांत काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, तुमचा सेवक असलेल्या मोदींनी 25 कोटी देशवासीयांना गरिबीतून बाहेर काढले.

पंतप्रधान म्हणाले की, मोदींचे हेच हमीपत्र येत्या पाच वर्षांसाठी अपडेट झाले आहे. गरिबांसाठी तीन कोटी पक्की घरे बांधणार, पाच वर्षे मोफत धान्य देणार, 70 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार, शेतकरी सन्मान निधी भविष्यातही सुरू राहील, ही मोदींची हमी आहे. भाजपाच्या जाहीरनाम्यात समाजातील प्रत्येक घटक आणि क्षेत्रासाठी विकासाचा ठोस आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांत देशातील महिला बचत गटांनी एक क्रांती सुरू केली, पण त्याची चर्चा क्वचितच होते. देशातील दहा कोटी महिला स्वयं-सहायता गटांशी संबंधित आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात बिहारमध्ये महिला बचत गटांना 150 कोटी रुपयांपेक्षा कमी मदत दिली जात होती, मात्र रालोआ सरकारने 40 हजार कोटी रुपयांहून अधिक मदत दिली, असे ते म्हणाले. या प्रयत्नामुळे एकट्या बिहारमध्ये 12 लाखांहून अधिक महिला लखपती दीदी झाल्या आहेत. आता भाजपाने देशातील तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याची मोहीम सुरू केली असून त्याचा बिहारच्या महिलांना देखील मोठा फायदा होणार आहे, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

देशातील सर्वच ठिकाणच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. भारतातील वारसा जागतिक वारसा नकाशावर नेण्याचा संकल्प भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात केला असून या उपक्रमामुळे मोठ्या संख्येने जागतिक पर्यटक भारतात येतील आणि संपूर्ण भारतातील पर्यटन स्थळांना फायदा होईल. जनतेचा उत्साह आज मोदी सरकारच्या विकासाचे प्रतिबिंब ठरला आहे. पण आतापर्यंत झालेला विकास हा केवळ ट्रेलर आहे, देशाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, तुमचे प्रत्येक स्वप्न हा मोदींचा संकल्प ठरेल असेही ते म्हणाले.

ही निवडणूक पक्षाची नसून देशाची निवडणूक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. एकीकडे देशाच्या संस्कृतीचा अभिमान बाळगणारी रालोआ आघाडी आहे आणि दुसरीकडे देशाच्या श्रद्धेला तडा देणारे लोक आहेत. उद्या, बुधवारी रामनवमीचा पवित्र सण आहे, सूर्यकिरणे उद्या अयोध्येत रामलल्लाच्या मस्तकावर विशेष अभिषेक करतील, पण अहंकारी आघाडीच्या नेत्यांना राम मंदिरामुळेही त्रास होत आहे. प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणारे लोक आज राम मंदिरासाठी अपवित्र भाषा वापरण्याच्या खालच्या पातळीवर गेले आहेत. अहंकारी आघाडीच्या नेत्यांनी एका समाजाच्या तुष्टीकरणासाठी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले. ही आपल्या देशाची मूल्ये आणि परंपरा नाहीत. या अहंकारी आघाडीचा एक नेता आणि काँग्रेसचा राजपुत्र उघडपणे हिंदू धर्माची शक्ती नष्ट करण्याची धमकी देतात. आज नवरात्रीचा पवित्र काळ असून भारत हा शक्तीचा उपासक आहे, या शक्तीचा कोणीही नाश करू शकत नाहीच, उलट सत्ता नष्ट करण्यासाठी निघालेल्यांचा नाश होणार असा इशाराही पंतप्रधानांनी दिला. इंडी आघाडीतील इतर सहकारी सनातन धर्माला डेंग्यू- मलेरिया म्हणतात. हा सनातन धर्माचा, आपल्या ऋषींचा आणि पूर्वजांचा अपमान आहे. इंडी आघाडी एकही जागा जिंकण्यास सक्षम नाही. या अहंकारी आघाडीकडे दूरदृष्टी नाहीच, आणि कोणताही विश्वासही नाही असे सांगत त्यांनी बिहारमधील इंडी आघाडीचा घटक असलेल्या ‘राजद’ ला लक्ष्य केले. बिहारमधील इंडी आघाडीचे पक्ष नितीश कुमारांची कामे दाखवून मते मागतात आणि नितीश – केंद्र सरकारच्या विकासकामांचे श्रेय घेतात. बिहारवर वर्षानुवर्षे सत्ता असूनही, राजद आपल्या कृतींवर चर्चा करण्यास सक्षम नाही. बिहारमधील जंगलराजचा सर्वांत मोठा चेहरा, भ्रष्टाचाराचे दुसरे नाव आणि विनाशाचा सर्वांत मोठा गुन्हेगार म्हणजे राजद आहे, अशा शब्दांत त्यांनी राजदला फटकारले.

या प्रचंड सभेत मोदी यांच्या भाषणप्रसंगी श्रोत्यांकडून उत्साही प्रतिसाद आणि मोदी विजयाच्या घोषणा दुमदुमत होत्या. यावेळी व्यासपीठावर हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि गया येथील एनडीएचे उमेदवार जीतन राम मांझी, लोक जनशक्ती पार्टी (पारस गट) अध्यक्ष पशुपतीनाथ पारस, बिहारचे उपमुख्यमंत्री  विजय सिन्हा आणि ज्येष्ठ नेते डॉ. प्रेम कुमार, पूर्णिया येथील एनडीएचे उमेदवार संतोष कुशवाह, कटिहारमधील उमेदवार दुलाल चंद्र गोस्वामी, संयुक्त जनता दलाचे खा.संजय झा, माजी उपमुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते श्री तारकेश्वर प्रसाद यांच्यासह भाजपा चे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!