जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकार्य आणि आत्मियतेने सर्व यंत्रणांनी काम करावे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे अमरावती जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्रमुख विभागांकडील विकास कामांची प्रगती व सद्यस्थिती याबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चा निधी नियोजित कामावर तात्काळ खर्च करा. तसेच आचारसंहितेचा कालावधी लक्षात घेता जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 चा निधी व या कामांवरील निविदा व कार्यालयीन आदेश व अन्य कामे 15 जुलै पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
जिल्हा समाज कल्याण विभाग (जि.प.), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा उद्योग विभाग, सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग, महापारेषण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा मार्केटिंग कार्यालय, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालय, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांच्या विभाग प्रमुखांशी पाटील यांनी संवाद साधून नियोजित कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
सर्वश्री खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त देविदास पवार, अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अधीक्षक अभियंता रुपा गिरासे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.