पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज सुपरस्पेशालिटी येथील कॅथलॅबचे लोकार्पण
अमरावती : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अमरावतीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या निधी अंतर्गत विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे नव्याने उभारलेल्या कॅथलॅबचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. . दरम्यान, अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त असलेल्या नूतन कॅथलॅबची पाहणी करून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील डॉक्टरांशी त्यांनी संवाद साधला. सुपरस्पेशालिटी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कॅथलॅबमुळे विभागातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना हृदयरोगासंबंधीच्या आजारावर उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. नवीन उपचार सेवा-सुविधा कार्यान्वित होत असताना त्या नियमितपणे सुरु राहाव्यात, याची जाणीवपूर्वक खबरदारी घ्यावी, अशा सूचना देखील चंद्रकांत पाटील यांनी आज रुग्णालय प्रशासनाला दिल्या .
ते पुढे म्हणाले की, गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या आजारांवर मोफत उपचार सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार खर्चाची मर्यादा वाढवून पाच लाख पर्यंत करण्यात आली आहे. या योजनेतून पाच लाखापर्यंत खर्च येणाऱ्या मोठ्या आजारांसाठी उपचार सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. या योजनेचा जनतेनी लाभ घ्यावा. रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवाऱ्याची व भोजनाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. तसेच निम्म्या किंमतीत जीवनाश्यक वस्तू उपलब्ध होतील, यादृष्टीने एखादे फिरते वितरण केंद्र सारखा उपक्रम राबविण्यात यावा. यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग घ्यावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी रुग्णालय प्रशासनाला केल्या. जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाही भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल. डॉक्टरांनीही आरोग्यसेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून रुग्णांना मनापासून औषधोपचार सेवा-सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.
खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे-पाटील, आमदार किरण सरनाईक, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, डॉ. मंगेश मेंढे, डॉ. अविनाश चौधरी, पदाधिकारी तुषार भारतीय, निवेदिता दिघडे यांच्यासह सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचे वैद्यकीय अधिकारी, अधिपरीचारिका व आरोग्य कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.