उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसळेची घेतली भेट… भावी वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा
पुणे : महाराष्ट्राचे सुपुत्र तसेच कोल्हापूरच्या रांगड्या मातीत वाढलेले ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसळे यांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 50 मी. 3 पोझिशन रायफल नेमबाजी प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून अवघ्या देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वप्नीलची भेट घेतली.
चंद्रकांत पाटील यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले. त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. खाशाबा जाधव यांच्या नंतर तब्बल ७२ वर्षानी कोल्हापूरच्या मातीला ऑलिंपिकच्या पदकाचा गुलाल लागला. कोल्हापूरबरोबरच महाराष्ट्रवासियांची मान अभिमानाने उंचावली.
या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण ४५१.४ गुण प्राप्त केले. भारताचे पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं कांस्यपदक आहे. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ होता. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने नेमबाजीत एकूण तीन पदके जिंकली आहेत. कोल्हापूरातील नेमबाज स्वप्नील हा मध्य रेल्वे मध्ये तिकीट कलेक्टर आहे. १९५२ सालच्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा यांनी कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते.त्यानंतर स्वप्नील हा दुसरा मराठमोळा खेळाडू बनला आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही खेळाडू कोल्हापूरचे आहेत.