राष्ट्र सेविका समितीच्या माजी अखिल भारतीय सह-कार्यवाहिका रुक्मिणी अक्काजी यांचे निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली
पुणे : राष्ट्र सेविका समितीच्या माजी अखिल भारतीय सह-कार्यवाहिका आदरणीय रुक्मिणी अक्काजी यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने राष्ट्र सेविका समिती आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून, सर्व स्तरांतून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.
रुक्मिणी अक्काजी यांच्या निधनाचे वृत्त समजताच महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना अत्यंत भावपूर्ण शब्दांत श्रद्धांजली वाहिली. चंद्रकांत पाटील आपल्या शोकसंदेशात म्हणाले, राष्ट्र सेविका समितीच्या माजी अखिल भारतीय सह-कार्यवाहिका रुक्मिणी अक्काजी यांचे निधन वृत्त अत्यंत दु:खद आणि वेदनादायी आहे. संस्कारांचा समृद्ध वारसा जपत, देशातील हजारो भगिनींच्या मनात राष्ट्रकार्याची ज्योत पेटवण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी आयुष्यभर केले. त्यांचे ध्येयवादी जीवन आणि विचार आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या परिवाराला तसेच समिती परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना!
रुक्मिणी अक्काजी या ‘राष्ट्र सेविका समिती’च्या अत्यंत ज्येष्ठ आणि समर्पित प्रचारिका होत्या. त्यांनी अनेक दशके समितीच्या अखिल भारतीय सह-कार्यवाहिका म्हणून काम पाहिले होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रभक्ती, संस्कार आणि महिला सशक्तीकरणासाठी समर्पित केले होते. त्यांनी राष्ट्र सेविका समितीच्या विस्तारामध्ये आणि मातृसंस्थेच्या विचारांचा प्रसार करण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावली. अनेक सेविकांना त्यांनी सेवा आणि राष्ट्रभक्तीचे धडे दिले. त्यांचे संपूर्ण आयुष्य साधेपणा, शिस्त आणि निःस्वार्थ सेवाभावाने परिपूर्ण होते.