ना. चंद्रकांत पाटील यांची मदत ठरली मोलाची… कोथरुडमधील दत्तात्रय इंगवले यांच्या कन्येची एअरक्राफ्ट मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून नागपुरात नियुक्ती
पुणे : आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मोठे स्वप्न पाहणाऱ्या कोथरुडमधील एका तरुणीचे मॅकेनिकल इंजिनिअर होण्याचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. सुतारदरा परिसरातील भेळ विक्रेते दत्तात्रय इंगवले यांच्या कन्या गायत्री एअर इंडियामध्ये मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून नियुक्ती झाली असून, तिच्या शिक्षणाच्या वाटचालीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीचा हात मोलाचा ठरला.
दत्तात्रय इंगवले हे भेळ विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांच्या कन्येने मॅकेनिकल इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. मात्र, आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेणे तिच्यासाठी आव्हानात्मक ठरत होते.
याच काळात राज्य सरकारच्या मुलींना उच्च शिक्षण मोफत या निर्णयामुळे तिच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला. तसेच, चंद्रकांतदादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीमुळे तिला शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठबळ मिळाले. या संधीचा योग्य उपयोग करत तिने अभियांत्रिकीचे शिक्षण शिवणे येथील ‘विंग्स कॅालेज ॲाफ एव्हिएशन टेक्नॅालॅाजी’ ह्या महाविद्यालयातून पूर्ण केले आणि आता नागपूर मध्ये एअर इंडियामध्ये एअरक्राफ्ट मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
दरम्यान, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इंगवले कुटुंबीयांची चंद्रकांत पाटील यांच्याशी अनपेक्षित भेट झाली. यावेळी कन्येच्या यशाबद्दल तिच्या पालकांनी दादांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या कुटुंबातील मुलीला शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याची संधी मिळाल्याने इंगवले कुटुंबीयांसाठी हा क्षण विशेष ठरला.
“आर्थिक परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य वेळी मिळालेली मदत आणि शिक्षणाची संधी एखाद्याचे आयुष्य बदलू शकते,” याचे हे उदाहरण असल्याची भावना यानिमित्ताने कोथरुड मध्ये व्यक्त होत आहे.