या नवरात्रीचे औचित्य साधून ऊर्जेचा अखंड स्रोत असणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान राखण्याचा निर्धार अधिक दृढ करुया – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : हिंदू धर्मामध्ये स्त्री हे आदिशक्तीचे रूप असून तिला देवी स्वरूप मानाचे स्थान आहे. नवरात्र म्हणजे देवीची उपासना करण्याचा आणि मातृ शक्तीचा सन्मान करण्याचा उत्सव. जिथे माता-भगिनींचा सन्मान केला जातो, देवता ही तेथे वास करतात असे मानणे ही आपली संस्कृती असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. या संस्कृतीचा आदर्श घेऊन आपल्या कोथरूड मतदारसंघामध्ये माता-भगिनींना स्वयंपूर्ण आणि सक्षम बनविण्याचा निर्धार केला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील हे नेहमीच स्त्रियांना प्रोत्साहन देत आले आहेत. गीता मालुसरे यांना उपलब्ध करून दिलेली वैद्यकीय मदत याचाच एक भाग आहे. गीता यांना केलेल्या सहकार्यामुळे आज त्या पुन्हा त्याच उत्साहाने अनेक भगिनिंसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या नवरात्रीचे औचित्य साधून ऊर्जेचा अखंड स्रोत असणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान राखण्याचा निर्धार अधिक दृढ करुया. ‘स्त्री शक्तीला’ प्राधान्य देत ‘तिला’ विकासाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्याचा निर्धार करूया, असे पाटील यांनी म्हटले.
आंतराष्ट्रीय जलतरणपटू गीता मालुसरे हिला काही वर्षांपूर्वी विजयदुर्ग परिसरातील समुद्रात पोहताना जेलीफिश चावला होता. हा प्रसंग तिच्या जीवावर बेतला होता. या घटनेमुळे राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवणाऱ्या गीताचे करियर धोक्यात आले होते. या घटनेची माहिती चंद्रकांत पाटील यांना समजताच त्यांनी तिच्या उपचाराचा सर्व खर्च उचलून तिला या संकटातून बाहेर काढले. आणि गीताने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर या संकटावर मात केली. पाटील यांनी तिच्या उपचाराचाच नाही तर खेळासाठीचा देखील सर्व खर्च उचलला. ते खेळासाठी, मेडिकलसाठी जी काही मदत गीताला लागत आहे ती सर्व मदत चंद्रकांत पाटील करत आहेत.