‘राम रामेति रामेति…’ मंत्राचा गजर अन् आनंदाश्रू; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक घेतले अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन

13

अयोध्या : “राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुुल्यं, रामनाम वरानने ॥” या शिवस्तोत्राचा आधार घेत, प्रभू श्रीरामाच्या नामात हजारो देवांच्या नावांची शक्ती असल्याचे सांगत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे सपत्नीक दर्शन घेतले. हा अनुभव अत्यंत भावूक आणि आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. प्रभू श्रीरामांच्या आदर्शवत जीवनाचा वस्तुपाठ आपल्यासमोर आहे. त्यामुळे डोळे मिटून प्रभू श्रीरामचरणी लीन होताना डोळ्यांतून आनंदाश्रूंची गंगा कधी वाहू लागली, ते समजलंही नाही. ते आनंदाश्रू, मनात दाटून आलेली कृतज्ञतेची भावना. खरं सांगतो, त्याची सर कशालाच नाही, असे पाटील यांनी म्हटले.

येथील अनुभव सांगताना पाटील म्हणाले, रामलल्ला आणि अयोध्या माझ्यासारख्या स्वयंसेवकांसाठी जणू स्वातंत्र्यलढाच. अयोध्येतलं श्रीराम मंदिर साकारण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या भूमीतच अनेक दशकं कठोर संघर्ष करावा लागला. त्या संघर्षात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी होण्याचं भाग्य लाभलं. त्याच मंदिरात आज प्रभू श्रीरामांसमोर नतमस्तक होतो… तेव्हा खारीचा वाटा म्हणजे काय, हे आपसूकच लक्षात आलं.

पाटील पुढे म्हणाले, तो संघर्ष, जिद्द, सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी तयार असलेले कारसेवक,सगळा चित्रपटच जणू बंद डोळ्यांसमोर झरझर चालला होता. प्रभू श्रीरामांना या भव्य, सुंदर मंदिरात विराजमान झालेलं याचि देही याचि डोळा पाहून खरोखरच त्या सगळ्या लढ्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.

प्रभू श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम, आदर्शवत मानतो. आपण प्रत्येकानंच त्यामुळे अयोध्येस जायलाच हवं. अयोध्येतल्या मंदिरातलं ऊर्जेनं भारलेलं वातावरण, रामनामाचा अविरत चालणारा जप, तो शरयूचा तट. मनात कायमचं घर करणाऱ्या या गोष्टींमुळे मनालाही लाभलेली, वर्णन करताच येऊ शकणार नाही, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.