दिल्ली: भाजपा केंद्रीय कार्यालयात ‘सेवा संकल्प अभियाना’चे नियोजन; राष्ट्रीय बैठकीस मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) केंद्रीय कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीस महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. आगामी काळात देशभर राबविल्या जाणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’ची सविस्तर रूपरेषा आणि नियोजन निश्चित करण्यासाठी या उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, तसेच त्यांच्या प्रदीर्घ २५ वर्षांच्या यशस्वी जनसेवेच्या गौरवार्थ आगामी १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत देशभर ‘सेवा संकल्प अभियान’ अत्यंत व्यापक प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे कोट्यवधी कार्यकर्ते महिनाभर विविध विधायक सामाजिक उपक्रम राबवतील, तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व जनकल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत थेट पोहोचवतील, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या देशव्यापी महत्त्वाच्या बैठकीस भाजपाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष, राष्ट्रीय सहसंघटन सरचिटणीस शिवप्रकाश, प्रमुख राष्ट्रीय पदाधिकारी तसेच देशातील सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, संघटन सरचिटणीस आणि वरिष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.