महाराष्ट्राच्या शिक्षकांचा देशपातळीवर गौरव; ९ कर्तृत्ववान शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन

8

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत, त्यांच्या स्वप्नांना बळ देत आणि ज्ञानाच्या माध्यमातून सक्षम पिढी घडविणाऱ्या महाराष्ट्रातील शिक्षकांचा राष्ट्रीय स्तरावर झालेला गौरव हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याची भावना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ कर्तृत्ववान शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

शिक्षकांच्या समर्पणाची राष्ट्रीय पातळीवर दखलपुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, अध्यापनातील नावीन्य, संशोधनाची दृष्टी, कौशल्याधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा हा यथोचित सन्मान आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि आपल्या शिक्षकांच्या समर्पणाची राष्ट्रीय पातळीवर झालेली ही दखल निश्चितच राज्याची मान उंचावणारी आहे. आपल्या ज्ञानाने आणि कर्तृत्वाने विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या या सर्व शिक्षकांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.

शालेय शिक्षण क्षेत्रातील डॉ. कविता गिट्टे, कुंदा बच्छाव, वैभव कुलकर्णी आणि शिवप्रसाद टिंगरे, उच्च शिक्षण क्षेत्रातील डॉ. विक्रम विशाल, डॉ. अमर ताकसांडे आणि डॉ. संदीपान नरोटे, तसेच कौशल्य विकास व उद्योजकता क्षेत्रातील किरण झारकर आणि अर्चना जाधव या पुरस्कारप्राप्त शिक्षकांना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच, गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानसमृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहन यावेळी केले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. देशभरातील ४८ शालेय शिक्षक, २१ उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि १३ कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षक, अशा एकूण ८२ शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, पदक आणि ५० हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी, शिक्षण मंत्रालयाचे सचिव अनिल कुमार, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या सचिव देबाश्री मुखर्जी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.