पुण्याला देशातील एक आधुनिकतम शहर म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

14

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून समान पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात आलेल्या नव्या पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यासोबतच महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या हिताच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार योगेश टिळेकर, चेतन तुपे, भीमराव तापकीर, महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम आदी उपस्थित होते.

या विकासकामांमुळे पुणे शहराच्या पायाभूत सुविधांना अधिक बळ मिळणार असून, नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः समान पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील पाणी व्यवस्थेत अधिक सुसूत्रता येणार असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे शहराला देशाचे ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’ म्हणून ओळख मिळत असून ती पुढे नेण्यासाठी मेट्रोचे जाळे, रस्त्यांची सुधारणा, भूमिगत बोगद्यांचे जाळे तयार करणे आदी माध्यमातून उत्तम वाहतुकीची व्यवस्था, चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्तम जीवनशैली सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे शहरात हाती घेतलेले प्रकल्प पुढील ३ ते ४ वर्षात पूर्ण झाल्यानंतर देशातील एक आधुनिकतम शहर म्हणून ओळखले जावे यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.

पुण्याचा नवीन विमानतळ, नवीन रिंग रोड, हडपसर पासून यवतपर्यंत आधुनिक प्रकारचा उन्नत मार्ग आदी सर्व माध्यमातून पुण्याची जोडणी चांगली करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, गतवर्षी एकट्या पुण्यात देशातील २५ टक्के जीसीसी तयार झाले आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानंतर पुढील लाट जीसीसीची असून त्यात पुणे पुढे चालले आहे. ते पुढे नेण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. पुण्याला एक आधुनिक शहर म्हणून पुढे नेण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. महात्मा फुले चौक ते खराडी हा मेट्रोसह दुमजली पूल उभारण्यात येत असून त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासह प्रवासातील १५ ते २० वाचणार आहेत. पुण्याला गतिमान करण्याच्या प्रयत्नातील हा एक महत्वाचा पूल आहे. कोंढवा परिसरातील रखडलेल्या कात्रज कोंढवा रस्त्याचे येत्या ६ महिन्यात भूसंपादन होऊन हा रस्ता पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.

देशातील पहिले पीपीपी तत्वावर दर्जेदार आरोग्य सेवा उभी करता येते हे या कर्करोग उपचार रुग्णालयाच्या उभारणीवरून दिसून येते. राज्यात मोठ्या प्रमाणात कॅन्सर ग्रीड तयार करण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न सुरू आहे. या ग्रीडच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला कॅन्सरवरील आधुनिक उपचार वेळेत आणि अत्यल्प दरात वा मोफत मिळाला पाहिजे असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये हे रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे बुधभूषण ग्रंथ लिहित आहेत अशा स्वरूपाचे शिल्प छत्रपती संभाजी उद्यान येथे उभारले आहे. ११ भाषा ज्ञात असलेले छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या १४ व्या वर्षी हा संस्कृत ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ म्हणजे इतिहासाचा प्रत्यक्ष नमुना आहे. या ग्रंथातील १० श्लोकांचा शिल्पात समावेश केला असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शहाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व त्यातून समजण्यास मदत होते.

समान पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात

समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत आज लोकार्पण झालेल्या पाण्याच्या टाक्यांमुळे दोराबजी पॅराडाईज, महंमदवाडी, एनआयबीएम या सर्व भागात समान पाणी पोहोचणार आहे. २०१५ साली पुण्यात वितरण व्यवस्था चांगली झाली पाहिजे असा आम्ही निर्णय घेतला. पुण्यात देशात सर्वाधिक पाणी वापर दिसत होता. त्याचे कारण ४० ते ५० टक्के पाण्याची गळती होत होती. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजना राबवून वितरण व्यवस्था अधिक चांगली करण्याचा निर्णय घेतला. त्यातून पाण्याचा नाश टाळून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाणी पोहोचवता यासाठी २०१७ साली या योजनेला मान्यता दिली. येथील लोकप्रतिनिधींनीही सतत पाठपुरावा केला. ही योजना हळूहळू अंतिम टप्प्यात चालली आहे याचा आनंद आहे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, शासन आणि खासगी क्षेत्र एकत्र आल्यानंतर जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळतात हे कर्करोग रुग्णालय हे उदाहरण आहे. आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करत आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांचे बुधभूषण ग्रंथ लिहितानाचे शिल्प केवळ पाहण्यासाठी नाही त्यांच्यासारखा कणखर बाणा आणि स्वराष्ट्राचा अभिमान सर्वांमध्ये जागृत करण्यासाठी प्रेरणा देईल, असेही श्रीमती पवार म्हणाल्या.

वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर या नऊ टाक्यामुळे येथील जनतेला पुरेशा दाबाने पाणी मिळेल. पाणी हे जीवन असून पाण्याची बचत करणे महत्वाचे आहे असेही त्या म्हणाल्या. मेट्रोच्या पुलामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून इंधनाची बचत होणार आहे. कामांच्या गुणवत्तेबरोबरच, भविष्यातील विचार करून नियोजन करण्यावर दिवंगत अजित पवार यांचा भर होता. त्यांच्या भूमिकेनुसार विकास कामे करण्यावर भर दिला जाईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.