मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ संपन्न
पुणे : पुणे येथे लतादीदी आणि आशाताई यांच्या नावाने जनसेवेसाठी उभारल्या जाणाऱ्या ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ चा कोनशिला अनावरण सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख प्रमुख उपस्थिती होती.
सामान्यांना माफक दरात अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, हा या प्रकल्पामागचा उदात्त हेतू अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. या सेवायज्ञाला पाटील यांनी मनापासून शुभेच्छा देखील दिल्या.
याप्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, लता मंगेशकर फाउंडेशनचे अध्यक्ष पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषाताई मंगेशकर, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लता-आशा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालय प्रकल्पात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यात अनेक व्यक्ती मदत करीत आहेत. शासनदेखील अशा धर्मादाय प्रकल्पांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल. रुग्णालयाकडे येण्यासाठी पुरेशा रुंदीचा रस्ता आणि पाण्याची सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल. धर्मादाय संस्थांच्या इमारतींना परवानगी देताना आकारल्या जाणाऱ्या प्रीमियमवर काही प्रमाणात सूट देण्याचा विचारही करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
फडणवीस म्हणाले, आज प्रत्येक व्यक्तीला उत्तम प्रकारची परवडणारी आरोग्य सुविधा मिळण्याची गरज आहे. धर्मादाय संस्था या क्षेत्रात कार्य करताना बऱ्याचदा असे प्रकल्प चालविण्यासाठी त्यात व्यावसायिकता दिसून येते. मात्र त्यासोबत सेवाभाव कसा असावा हे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने दाखवून दिले आहे. हाच अनुभव लता-आशा रुग्णालय प्रकल्पाच्या माध्यमातून मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या रुग्णालय प्रकल्पात विविध प्रकारच्या चिकित्सा पद्धती, रुग्ण पुनर्वसन केंद्र आणि कर्करोग केंद्र असल्याने रुग्णांवर चांगले उपचार होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दिवंगत आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मंगेशकर कुटुंबाने जीवनभर स्वरांची सेवा केली आहे. आशाताईंनी जीवनातील कटू अनुभवांना सकारात्मकतेत परिवर्तीत केले. जीवंतपणा ठासून भरलेले त्यांचे व्यक्तीमत्व होते, त्यांनी कधीही नकारात्मकतेला जवळ येऊ दिले नाही. वयाच्या नव्वदीत तीन तासांची मैफल करणे अलौकिक असल्याचेही फडणवीस म्हणाले.
लता-आशा रुग्णालयात माणुसकीची ऊब मिळेल -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे आणि महाराष्ट्रासाठी आजचा दिवस भाग्याचा असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळते आहे. यापुढेही नव्या रुग्णालय प्रकल्पामुळे हजारो लोकांना जीवनदान लाभणार आहे आणि अनेक कुटुंबांचे दु:ख दूर होईल, तसेच रुग्णांची जीवन जगण्याची आशा पल्लवीत होईल. मंगेशकर कुटुंबाने गाण्यापलिकडे जाऊन राष्ट्रभक्तीच्या भावनेने सेवा कार्य केले आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या रुग्णांना माणुसकीची ऊब मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, आपलेपणा असला तर सेवा आपोआप घडते. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी अखंड स्वरसेवा केली. म्हणून त्यांचे स्वर मानवी वेदना दूर करणारे आहेत. लता-आशा रुग्णालय प्रकल्पाची सुरूवात दोन्ही गायिकांच्या कार्याला दिलेली श्रद्धांजली आहे. माणसासाठी जीवनावश्यक बाबीत शिक्षण आणि आरोग्य महत्वाचे आहे. या दोन्ही गोष्टी सर्वांना परवडणाऱ्या आणि सुलभ असण्याची गरज आहे. सर्व प्रकारची चिकित्सा एकाच ठिकाणी उपलब्ध झाली तर रुग्णावर होणारा खर्च कमी होतो. मंगेशकर कुटुंबीयांच्या सेवेच्या दृष्टीकोनानुसार ही योजना नव्या रुग्णालय प्रकल्पात करण्यात आली आहे.