पुस्तकांशी मैत्री करणारी ही पिढीच उद्याचे प्रगल्भ महाराष्ट्र घडवेल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत असतानाच मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने पुणे महानगरपालिका, पुणे पुस्तक महोत्सव आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘पुणे बाल पुस्तक जत्रा-२०२६’ चे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. पुणे पुस्तक महोत्सवाप्रमाणेच या उपक्रमालाही चिमुरड्यांचा आणि पालकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
या प्रसंगी मंत्री उदय सामंत, आ. हेमंत रासने, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, शामकांत देवरे, विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, महापालिकेच्या शिक्षण अधिकारी आशा राऊत, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, सुनील महाजन, साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, राजीव तांबे यांच्यासह महापालिकेतील नगरसेवक आणि वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उपयुक्त असणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातच होणार असून, याबाबत कोणीही शंका बागळू नये. त्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. या माध्यमातून लहान मुलांना आणि युवकांना वाचनाची गोडी लावण्यासाठी त्यांना उत्तम पुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांना पार पाडण्याची आहे, असे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. वाचन संस्कृती केवळ मुख्य शहरापुरती मर्यादित न राहता ती वस्ती पातळीवर रुजली पाहिजे, हा उपमहापौरांचा आग्रह अत्यंत रास्त आहे. यावर आम्ही नक्कीच गांभीर्याने विचार करून अंमलबजावणी करणार आहोत, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
पाटील पुढे म्हणाले की, तरुण, लहान मुले वाचत नाही असे सरसकट म्हणणे, आता उचित ठरणार नाही. गेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला १५ लाख नागरिकांनी भेट दिली. यातील ५ लाखांपेक्षा अधिक उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि लहान मुले होते. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालकांची आहे त्यासाठी त्यांना दर्जेदार बालसाहित्य उपलब्ध करून द्यावे लागेल लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यातून वाचन चळवळ पुढे जावे, यासाठीच पुणे बाल पुस्तक जत्रेचा अभिनव प्रयोग राज्यात गेल्या दोन वर्षापासून होत आहे. या जत्रेत सर्व पुणेकरांनी कुटुंबासह सहभागी होऊन, मराठी भाषा आणि साहित्य-संस्कृती वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे पाटील यांनी यावेळी म्हटले.
पुस्तकांशी मैत्री करणारी ही पिढीच उद्याचे प्रगल्भ महाराष्ट्र घडवेल, असा मला विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले. ही जत्रा ४ मेपर्यंत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे विनामूल्य सुरू आहे, याचा पुणेकरांनी नक्कीच लाभ घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले.
राज्य सरकारने लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मराठी भाषा वैश्विक केंद्र पुढील दोन महिन्यात निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होण्याची दाट शक्यता असून, तशा पद्धतीने चर्चा सुरू आहेत या संमेलनालाही पुणेकर मोठा प्रतिसाद देतील, यात शंका नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.