सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे रुग्णालय निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार – मंत्री चद्रकांत पाटील
पुणे : पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त भागीदारीतून PPP तत्वावर उभारण्यात आलेल्या पुण्यातील पहिल्या विशेष रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या लोकार्पण सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे रुग्णालय निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उपक्रमासाठी मंत्री पाटील यांनी पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअरचे मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, उपमहापौर परशुराम वाडेकर, महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम आदी उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल असून सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून निर्माण झालेले हे केंद्र आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्करोगाचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र उपचारात विलंब झाल्यास रुग्णांना दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात आणि त्यासाठी मोठा आर्थिक खर्चही करावा लागतो. हीच बाब लक्षात घेत सर्वसामान्य नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा समावेश केला आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ‘कर्करोग ग्रीड’ तयार करण्यात येत असून या माध्यमातून राज्यातील रुग्णांना अधिक सक्षम आणि सुलभ उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यभरातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि समन्वयित करण्यासाठी हे ग्रीड महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.