मोदींच्या वाढदिवसापासून सेवा संकल्प अभियान…केंद्रीय मंत्री अमित शाहांची घोषणा
मुंबई : केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी १३ सप्टेंबर रोजी ‘सेवा संकल्प अभियान २५’च्या निमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार विनोद तावडे, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सेवा आणि समर्पणाला आपल्या सार्वजनिक जीवनाचा केंद्रबिंदू मानणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सार्वजनिक कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून सेवाभावाची ही प्रेरणा अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
‘जनसेवा हीच प्रभूसेवा’ या भावनेतून या अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासह १२ विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याबाबतची सर्व माहिती या पत्रकार परिषदेतून देण्यात आली.
आधी गुजरातनंतर संपूर्ण देशात जन्मदिवस साजरा केला जात होता. यावर्षी विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी मोदीजी यांच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यकाळाला 25 वर्षे पूर्ण झाली आहे. या देशात खूप कमी लोक आणि नेते असे आहेत जे राज्याच्या मुख्यमंत्री पदापासून ते पंतप्रधान अशी पदे भूषवताना देशाचे नेतृत्व करत आले आहेत असे अमित शाह यांनी यावेळी सांगितले. जनकल्याण,राज्य आणि राष्ट्रसेवेच्या या यज्ञाला अहर्निश सुरु ठेवणे महत्वाचे आहे.त्यामुळे सेवा संकल्प अभियान सर्व देशात रावबला जाणार आहे. प्रत्येक भाजपाच्या प्रत्येक विभाग, जिल्ह्यात, प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रात हे अभियान राबवले जाणार असल्याचेही अमित शाह यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. रक्तदान, आभार, नमो सेवा, संगीत नाट्यमय प्रस्तुती, अंगणवाडी सेवा, सेवा ज्योती कलस यात्रा, वाडनगर ते वाराणसी यात्रा, वाराणसे ते वाडनगर यात्रा, सेवा सेतू अभियान, ब्लॉक आणि तालुका स्तरावर सर्व सरकारी पातळीवर हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.