पॉलीटेक्निक प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास ६ जुलैपर्यंत मुदतवाढ; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

8

मुंबई : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या (पॉलीटेक्निक) केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी (CAP) अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना ६ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जुलै २०२६ अशी होती. मात्र, विद्यार्थ्यांची वाढती मागणी आणि प्रवेशासाठी मिळालेला भरघोस प्रतिसाद लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

अर्ज भरण्याच्या आधीच्या शेवटच्या दिनांकापर्यंत राज्यभरातून तब्बल १,६१,७८६ उमेदवारांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी १,३२,९९६ विद्यार्थ्यांनी अधिकृत शुल्क भरून आपले अर्ज निश्चित (Confirm) केले आहेत. प्रवेशाचा हा वाढता ओघ पाहता, कोणताही पात्र विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू नये, म्हणून महायुती सरकारने ही मुदतवाढ दिली आहे.

विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रवेश प्रक्रियेच्या कॅप (CAP) फेऱ्यांचे तारखांसह सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा इतर संपूर्ण तपशील जाणून घेण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या dte.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच, सर्व पात्र उमेदवारांनी या सुधारित अंतिम मुदतीचा लाभ घेऊन आपले प्रवेश अर्ज वेळेत निश्चित करावेत, असेही त्यांनी नमूद केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.