राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : सांताक्रूझ येथील कलिना कॅम्पसमध्ये उभारण्यात येत असलेल्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकाम प्रगतीची राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी निर्माणाधीन ऑडिटोरियम हॉल तसेच वाचन कक्षाची (रीडिंग रूम) सखोल तपासणी करून, फर्निचरसह उर्वरित सर्व कामे डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्णत्वास नेण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या पाहणी दौऱ्यात पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. आपली भूमिका स्पष्ट करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “राज्यातील वाचक, विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी हे ग्रंथालय ज्ञानार्जनाचे एक अत्यंत सुसज्ज व आधुनिक केंद्र ठरावे, हा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने इमारतीचे संपूर्ण काम उच्च दर्जाचे व्हावे आणि फर्निचरसह उर्वरित सर्व कामे डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्णत्वास न्यावीत.”
या पाहणी दौऱ्याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मुंबई सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके यांच्यासह सार्वजनिक बांधकाम व उच्च शिक्षण विभागाचे इतर संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.