पुस्तक वाचनातून जीवन समृद्ध होते; वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शासनाचे प्रयत्न – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

4

मुंबई, दि. २८ : पुस्तकांच्या माध्यमातून अनेक विचारवंतांचे वर्षानुवर्षांचे चिंतन आणि अनुभव आपल्याला अल्पावधीत जाणून घेता येतात. पुस्तक वाचनामुळे व्यक्तीचे जीवन समृद्ध होते. समाजात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी शासन आणि विविध संस्था सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मुंबई पुस्तक महोत्सवाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा वाचन संस्कृतीच्या वाढत्या आवडीचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी महोत्सवाचे मुख्य आयोजक आमदार अमित साटम, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रवींद्र कुलकर्णी, मुंबई पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी, मुंबई पुस्तक महोत्सवाचे मुख्य संरक्षक प्रा मिलिंद मराठे, आदी उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी महोत्सवातील विविध पुस्तक दालनांना भेट देऊन पुस्तकांची पाहणी केली तसेच काही पुस्तकांची खरेदीही केली.

यावेळी सेंट्रल रेफरन्स लायब्ररी, भारत सरकार यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय ग्रंथ सूची – मराठी विभाग’ या ग्रंथसूचीचे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, नॅशनल बुक ट्रस्ट ही केंद्र सरकारची वाचन संस्कृती वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणारी संस्था आहे. पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून वाचक, विद्यार्थी, प्राध्यापक, लेखक आणि नागरिकांना एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पुस्तके उपलब्ध होत आहेत. मुंबई पुस्तक महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद पाहता मुंबईकरांमध्येही वाचनाची मोठी आवड असल्याचे दिसून येते. प्रदर्शनातील गर्दी आणि पुस्तक खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह कौतुकास्पद आहे.

पुण्यातील पुस्तक महोत्सवाच्या अनुभवाविषयी त्यांनी सांगितले की, पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात पुस्तक प्रदर्शन सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच या प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दरवर्षी स्टॉल्सची संख्या आणि पुस्तक विक्रीत लक्षणीय वाढ होत आहे. यंदाही मोठ्या प्रमाणावर स्टॉल्स उभारण्याचे नियोजन असून, पुस्तक विक्रीला आणखी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुण्याला जागतिक स्तरावर पुस्तकांची राजधानी म्हणून मान्यता मिळण्याची संधी असल्याचे सांगून त्यांनी मुंबईतही पुस्तक महोत्सवाचे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्याची गरज व्यक्त केली. मुंबई विद्यापीठाच्या परिसरात एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी, वाचक आणि नागरिक येत असल्याने विद्यापीठालाही व्यापक जनसंपर्काची संधी मिळाली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या विश्वाशी जोडले जाण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुस्तक वाचनामुळे इतरांच्या अनेक वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून आपल्याला शिकण्याची संधी मिळते. त्यामुळे लिहिणे, वाचणे आणि वाचलेल्या साहित्याचे आकलन करणे यांना समाजजीवनात महत्त्वाचे स्थान आहे. साहित्य आणि पुस्तकांच्या माध्यमातून व्यक्तीचे विचारविश्व समृद्ध होऊन जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अरुण साधू लिखित ‘महाराष्ट्र’, कुलदीप चंद अग्निहोत्री लिखित ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर – यात्रा के पदचिन्ह’ आणि रघुवेंद्र तंवर लिखित ‘सरदार पटेल : एक सचित्र जीवनी’ या पुस्तकांची खरेदी केली. महोत्सवाच्या आयोजकांचे त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.