कोल्हापूरकरांनी खरचं ठरवलं,की ध्यानात ठेवलं…

2498 16,059

लाव ऊस ओढ गोणी, आमच्यावाणी नाही कोणी, असं म्हणत दक्षिण महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यात ऊसाच्या राजकारणाची गोडी मोठ्या चवीनं चाखणाच्या पंचगंगा,वारणा,कोयणा आणि कृष्णेच्या खोऱ्यात यंदांच्या लोकसभेची निवडणूक ख-या अर्थाने प्रतिष्ठेची ठरली. इथल्या पाण्याला जसी अवीट गोडी आहे अगदी तसेच इथले राजकारणही गोड्या पाण्याच्या प्रवाहात नकळतपणे कडवटपणा धारण करतं. कोल्हापूर, सागली आणि सातारा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात याचा प्रत्यय उभ्या महाराष्ट्राने अनुभवला आहे. कोल्हापूरात आमचं ठरलंय या टॅगलाईनने अख्या निवडणुकीचा पोतच बदलला, तर तिकडे सांगलीत भाजप आणि काँग्रेसच्या सरळ होणा-या लढतीत वंचित बहुजन आघाडीने ऐनवेळीची उमेदवारीची टोपी आटपाडीच्या गोपीला घातल्याने इथला गुलालही २३ मेच्या अखेरच्या क्षणापर्यंत थबकून राहील हे निश्चित. पलीकडे साता-याची गादी परंपरेनुसार राष्ट्रवादीच्या अधिपत्याखालीच राहील हे जवळपास निश्चित असले तरी पहिल्यांदाचा येथे उदयनराजेंना मोठ्या आव्हानाना सामोरे जावे लागल्याचे चित्र होते. मराठा आरक्षण चळवळीचे जनक अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव माजी आमदार नरेंद्र पाटील यांनीच राष्ट्रवादी ते शिवसेना व्हाया भाजप असा प्रवास करत उदयनराजेंना आव्हान दिले होते. अर्थात, येथे या मतदारसंघात असणारे राष्ट्रवादीचे प्राबल्य आणि राजेंची युवकांमधील क्रेझ भेदणे तितकेसे सोपे नव्हते. मात्र, वाई आणि पाटणच्या डोंगरी भागात नरेंद्र पाटील यांना मिळालेला प्रतिसाद राजेंचे मताधिक्य कमी करू शकतो. शिवाय पहिल्यांदाच या भागात भाजपने आपले चिन्ह पोहोचवल्याने विधानसभेला राष्ट्रवादीसाठी ही डोकेदुखी ठरणार आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यप्राप्तीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कृष्णाकाठच्या सांगलीत काँग्रसला उमेदवार शोधण्याची वेळ आली. अर्थात, हा आक्रीत राजकारणाचा नमुना होता. वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी मी लढतो, द्या उमेदवारी, अशी आरोळीही दिली. मात्र, तोपर्यत वेळ निघून गेली होती. परिणामी, काँग्रेसने ही जागा महाआघाडीत मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानीच्या पारड्यात अक्षर :श दान दिली. मात्र,संधी आली की ती दवडायची नाही हा शिरस्ता घेऊन राजकारण करणाऱ्या खा.राजू शेट्टी यांनी कृष्णा काठावर गुलाल लावायचा असेल तर वसंतदादांचा वारसच रिगणात हवा हे पक्के हेरले आणि काँग्रेसने डावललेल्या विशाल पाटील यांनाच रिंगणात उतरवून भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले. सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यात तिहेरी सामना झाला. सुरुवातील एकतर्फी वाटणा-या या निवडणुकीत स्वाभिानच्या विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या पडळकर यांनी मैदानात उतरून भाजपच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवून दिल्याने अख्खा कृष्णाकाठ ढवळून निघाला. निवडणुकीच्या निकालाला अजून १३ दिवसांचा अवधी असला तरी सर्वच उमेदवारांच्या कार्यकत्यांनी पैजांचा पाऊस पाडल्याने वसंतदादाची सांगली कोण जिंकतो याकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

इकडे पंचगगेच्या काठावरही यापेक्षा वेगळे काही घडत नाही. ऊसाच्या हिरव्यागार शेतीने समृध्द झालेला कोल्हापूर जिल्हा आपल्या वेगळ्या शैलीच्या राजकारणासाठी पूर्वापारपासून प्रसिध्द आहे. २०१९ ची निवडणूक तरी याला कसी अपवाद ठरेल. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय मंडलिक या दोघांमध्येच झालेली पंचगंगा काठावरची झुंज कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात सर्वात लक्षवेधी ठरली. इथे शिवसेनेच्या जोडीला काँग्रेसच्याच आमदारांची मिळालेली साथ अनेकांच्या भुवया उंचावून गेली. त्यातच निवडणूक प्रचाराच्या मध्यात आमचं ठरलंय या टॅगलाईननं अक्षरःश धुमाकूळ घातला. ही टॅगलाईन राज्यभर व्हायरल झाल्याने दस्तुरखुद्द शरद पवार यांनाही याची दखल घ्यावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात चालविलेल्या या कॅम्पेनला मुरब्बी पवार यांनीही तुमचं ठरलंय तर मी बी ध्यानात ठेवलंय असं म्हणत उत्तर दिलं. कोल्हापूरची ही जागा गत निवडणुकीत राष्ट्रवादीकडेच असली तरी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत पक्षाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या एका गटाने उघडपणे त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर उदभवलेली ही खदखद पक्षाला परवडणारी नसल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक जाहीर होण्याआधी एका महिन्यात तब्बल पाचवेळा कोल्हापूरचा दौरा करावा लागला. पवार यांनीच ही जागा प्रतिष्ठेची केल्याने मावळ्यांनाही नाईलाजास्तव प्रचारात उतरावे लागले. अर्थात, महाडिक यांनी स्वत:ची यंत्रणा आणि मतदारसंघातील त्यांची ताकद याच्या जोरावरच निवणूकीचे मैदान गाजवले. तरप्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनीही राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये महाडिक यांच्याबद्दल असणा-या खदखदीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न केला. अर्थात, कोल्हापूरच्या जनतेने खरचं ठरवलं की ध्यानात ठेवलं याचा फैसला २३ मे रोजीच होइल. 

Get real time updates directly on you device, subscribe now.