विरार: …. तर कारगिल नगरची धारावी होईल!

14

अखेर कधी नव्हे; ती भीती खरी ठरलीच. विरार-कारगिल नगर येथील चौकात गरुवारी कोरोनाचा संशयित सापडला. सकाळी 11 च्या सुमारास महापालिकेची एक रुग्णवाहिका या रुग्णाला न्यायला आली; तेव्हा या चौकात नेहमीसारखाच बाजार भरला होता.

हा तोच चौक जो मागील कित्येक दिवस सोशल मीडियावर चर्चेत होता. कित्येक व्हीडियो आणि गर्दीचे फोटो या चौकातून प्रसारित झाले होते; मात्र याचे गांभीर्य कुणालाच नव्हते.

अनेकदा नगरसेवक, पोलीस यांनी समजावून पाहिले; पण लोक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. तसे ते आजही नाहीत.

हा तोच चौक; जिथे खिचडीसाठी दररोज शेकडो लोक जमा होतात. राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांच्याकडून या लोकांना खिचड़ी आणि जेवण पुरवठा होतो आहे.

पण कित्येकदा या गर्दीने सोशल डिस्टनसिंगचे नियम मोडीत काढले होते. आज संशयित सापडला आहे; तो इथेच लागून असलेल्या इमारतीत राहतो.

त्यामुळेच या भीतीला महत्त्व आहे. लॉकडाउन सुरु झाल्यापासून संपूर्ण वसई-विरारमध्ये रुग्ण सापडत होते; मात्र कारगिल नगर त्याला अपवाद होते. खरे तर इथली गर्दी आणि लोकांची बेशिस्त पाहता ते सुदैवच म्हणायला हवे. पण ही भीती नाकारुनही चालणारही नव्हती.

कारण इथे रुग्ण सापडला तर धारावीची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती आधीपासूनच होती.

मागील काही वर्षांत कारगिल नगर राज्यात परिचित ते इथली झपाट्याने वाढलेली लोकसंख्या आणि असुविधांमुळे. मागील महापालिका निवडणुकीत इथे थेट तीन प्रभाग पडले, यावरून इथल्या लोकसंख्येचा आवाका कुणाच्याही लक्षात यावा.

दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या इमारती आणि चाळी, त्यातील अनियोजन, चिंचोळे रस्ते, पाण्याचा तुटवड़ा अशा अनेक समस्यांशी हा परिसर नेहमीच झगडत राहिला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे या भागात माणसामाणसातील अंतर (density) प्रचंड कमी आहे. रस्त्यावरुन चालायचे तरी माणसे अंगचटीला येऊन चालतात. मनवेलपाडा बाजार आणि कारगिल नगरच्या रस्त्यावर असे माणसांचा ओसंडून वाहणारा महापूर नेहमीच दिसला आहे. त्यात उपजत असलेली बेशिस्त.

त्यामुळे कोविड-19 च्या महासंकटात या परिसराची कसोटी आहे. आज संशयित सापडला त्या पार्श्वभूमीवर हा परिसर या कसोटीला कसे समोरे जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. फ़क्त कारगिल नगरने धारावीची पुनरावृत्ती केली नाही म्हणजे मिळवले. तशी ती होऊ द्यायची नसेल तर इथल्या लोकांना वाटेल त्या किमतीत शिस्त लावावी लागेल.