बविआने महायुतीला ‘खिंडीत` गाठले! आमदार हितेंद्र ठाकूर यांचा सूचक इशारा

35

विरार / संजय राणे : ‘कित्येक वेळा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला आहे. आता तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. उगाच उमेदवार घोषणेत वेळ वाया घालवू नका,` असा सूचक इशारा बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी महायुतीला दिला आहे.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरता पालघर लोकसभा मतदार संघातून बहुजन विकास आघाडी उमेदवार देणार असल्याची घोषणा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. मात्र उमेदवार निवडीचा निर्णय कार्यकर्ते घेतील. त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांसोबत चर्चा-विनिमय सुरू असल्याची माहिती आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. बहुजन विकास आघाडीचे बोईसर, वसई आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघांत तीन आमदार आहेत. याशिवाय अन्य उर्वरित तीन मतदारसंघांतील आमदारांना बहुजन विकास आघाडीने प्रत्येक निवडणुकीत सहाय्य केलेले आहे.

बोईसर, वसई आणि नालासोपारा मतदारसंघांत बहुजन विकास आघाडीचे मोठे माताधिक्य आहे. या ताकदीवर बहुजन विकास आघाडी आपला खासदार निवडून आणू शकते, असा आत्मविश्वास आमदार हितेंद्र ठाकूर यांना आहे. मात्र त्यानंतरही आमदार हितेंद्र ठाकूर उमेदवार निवडीत ‘वेट अँड वॉच`ची भूमिका घेत असल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे.

या चर्चांचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी खंडन केले आहे. आपल्यावर ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्स अशा कोणत्याच यंत्रणांचा दबाव नाही; किंबहुना सर्व पक्षांत आपले मित्र आहेत. ते माझा आणि मी त्यांचा सन्मान करतो. त्यामुळे आपल्या बाबतीत अशा चौकशी लागण्याची शक्यता नाही. आणि मीही त्यांना घाबरत नाही, अशा शब्दांत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान; पालघर लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या भाजप अथवा शिवसेना (शिंदे गट) यांनीही अद्याप उमेदवार घोषित केलेला नाही. या मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित हे खासदार आहेत. तर भाजपनेही या मतदारसंघावर दावा केला असल्याचे सांगितले जाते. उमेदवार घोषणेचे घोडे चर्चेत अडले असल्याने बहुजन विकास आघाडीनेही त्यांच्याच चालीने जाणे पसंत केले आहे.

विशेष म्हणजे शिवसेना (शिंदे गट) खासदार राजेंद्र गावित यांना पुन्हा उमेदवारी देण्यास आग्रही आहे. परंतु बहुजन विकास आघाडीचा त्यांना प्रचंड विरोध आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांच्याशीही आमदार हितेंद्र ठाकूर यांचे जमत नाही. त्यांना उमेदवारी मिळू नये, यासाठीच बहुजन विकास आघाडीने उमेदवार घोषणेचे ‘दबाव तंत्र` वापरले असल्याचे म्हटले जाते.

त्या तुलनेत बहुजन विकास आघाडी भाजपच्या कलाने जाऊ शकते. मात्र भाजपकडे उमेदवारीसाठीचा चेहरा नाही. त्यासाठी खासदार राजेंद्र गावित यांना भाजपमध्ये आणून उमेदवारी दिली जाऊ शकतेे. खासदार राजेंद्र गावित त्याकरता इच्छुक असल्याचे म्हटले जाते. तसे झाल्यास आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात आंदोलने व प्रचार करणाऱ्या गावित यांना बहुजन विकास आघाडीच्या समर्थनासाठी भाजपच्या सोबतीने आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या दरबारात यावे लागेल. मात्र तशी शक्यता किती? याबाबत आताच सांगता येणार नाही. तसे झाल्यास आमदार हितेंद्र ठाकूर आपल्या हितशत्रूंना अप्रत्यक्ष अस्मान दाखवू शकणार आहेत.

राजेंद्र गावित यांनी आपल्या संभावित उमेदवारीसाठी प्रयत्न करत असताना मागील दोन वर्षे वसई तालुक्यात आपले राजकारण रंगवण्याचा प्रयत्न केला. असे करताना त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बहुजन विकास आघाडीला विरोध केला. आमदार हितेंद्र ठाकूर यांना विश्वासात न घेता भाजप अथवा शिंदे सेनेकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळत असेल तर पालघर लोकसभा क्षेत्रात प्रभावी पक्ष असणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांची दखल या दोन्ही पक्षांना घ्यावीच लागेल. यासाठी कदाचित हितेंद्र ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांतून तसा सूचक इशारा दिला असावा. राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला हा विरोध असावा, अशी मांडणीदेखील या भूमिकेतून असू शकते.

आणि त्यासाठीच आमदार हितेंद्र ठाकूर अशा पद्धतीचे दबावतंत्र वापरत असल्याचे राजकीय निरीक्षण आहे. त्यामुळे उमेदवार निवडीत आपला वेळ वाया न घालवता, आम्हाला समर्थन द्या, असा सूचक इशारा महायुतीला देऊन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी तूर्त तरी सर्वांना ‘खिंडीत गाठले` आहे. हा न्यौता महायुतीने नाकारल्यास आमदार हितेंद्र ठाकूर यांना मात्र स्वबळावर निवडणूक लढवण्यावाचून पर्याय राहणार नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.