आर्थिक वादापोटी रस्ते साफसफाईची निविदाप्रक्रिया दोन‌ वर्षांपासून रखडली; राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारकीर्दीत स्वच्छतेच्या बाबतीत पिंपरी चिंचवडला देशात जे मानांकन मिळवून दिले. त्यामध्ये महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे घसरण झाली. आर्थिक आणि वर्चस्ववादाच्या भाजपमधील लढाईमध्ये शहर स्वच्छतेसाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्ते साफसफाईची निविदाप्रक्रिया मागील दोन वर्षांपासून रखडली आहे. शहर स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडण्यास सत्ताधारी कारणीभूत आहेत. त्यांनी साडेचार वर्षाच्या कार्यकाळात ‘स्वच्छ पिंपरी-चिंचवड’ या उद्देशाला तिलांजली दिल्याचा आरोप पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे.
पिंपरी चिंचवड शहर‌ स्वच्छता आणि रस्ते सफाईची निविदाप्रक्रिया रखडल्याच्या विषयावरुन‌ संजोग वाघेरे‌ पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपवर टिका केली‌ आहे. ते‌ म्हणाले की, स्वच्छ सर्वेक्षणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात २०१६ मध्ये पिंपरी चिंचवड शहर देशात टॉप १० मध्ये होते. शहराचा ९ वा क्रमांक आला होता. तर, महाराष्ट्रातून आपले शहर १ नंबर होते. परंतु, २०१७ मध्ये शहरवासीयांची दिशाभूल करून भाजपने सत्ता मिळवली. तेव्हापासून मागील साडेचार वर्षाच्या कारभारात शहराच्या हिताला बाधा पोहचविणा-या धोरणांमुळे भाजपच्या हाती सत्ता मिळाल्यापासून स्वच्छ सर्वेक्षणात घसरण झाली. २०१७ मध्ये देशात थेट ७२ व्या नंबरवर गेले गेले होते. मागील सर्वेक्षणात २०१९ मध्ये देशात ५२ व्या क्रमांकावर शहर आहे. शहर स्वच्छतेत पिंपरी-चिंचवडचे मानांकन उंचावणे सत्ताधारी भाजपला शक्य झालेले नाही.
आर्थिक लाभापायी पिंपरी-चिंचवड शहराचे दोन तुकडे पाडण्याचे काम कचरा संकलनाच्या कामात कसे केले गेले ? हे शहरवासीयांनी पाहिले. कचरा संकलनातील कारभारानंतर शहराच्या स्वच्छतेचा महत्त्वाचा भाग असलेल्या रस्ते साफसफाईच्या कामाचाही पुरता बोजवारा भाजपच्या धोरणांमुळे झाला आहे. निविदाप्रक्रियेत हस्तक्षेप आणि प्रशासनावर दबावामुळे या कामाची निविदाप्रक्रिया मार्गी लागत नाही. यावरून भाजपच्या कारभाराचा जनतेने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. काही दिवसांपासून भाजपच्या पदाधिका-यांकडून इंदोर शहराचे कौतूक ऐकायला मिळत आहे. त्या धर्तीवर शहर स्वच्छ करण्याच्या नुसत्या वल्गना निवडणुकीच्या तोंडावर सुरू आहेत. प्रत्यक्षात स्वच्छतेच्या बाबतीत सत्ताधारी म्हणून भाजपने कधीही शहराचा विचार केलेला नाही.
‘स्वच्छ पिंपरी-चिंचवड’ करण्याच्या वाटचालीत भाजपने योगदान देण्याऐवजी वारंवार खोडा घातल्याचे या सगळ्या परस्थितीवरून पाहायला मिळते. दोन ते अडीच वर्ष शहर स्वच्छतेशी निगडीत महत्वाच्या कामांची प्रक्रिया तडीस जात नसेल, तर हे सत्ताधारी म्हणून भाजपचे सर्वात मोठे अपयश आहे. त्यांच्या गतिमान आणि पारदर्शक कारभाराच्या घोषणा हवेत विरल्या आहेत. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. निव्वळ भुलथापा मारून शहरवासीयांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा हा भाजपचा कारभार यापुढे चालणार नाही, असेही संजोग वाघेरे पाटील यांनी नमूद केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!