‘फडणवीसांच्या काळातील फाईल्स बाहेर काढू’ चंद्रकांतदादाच्या धमकीला पटोलेंचं प्रत्युत्तर
मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येत्या काळात काँग्रेसच्या २ बड्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या याच धमकीला काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या नेत्यांनी काही केलं नाही. आम्हाला घाबरण्याची गरज नाही. पण आम्ही मात्र आता फडणवीसांच्या काळातील फाईल्स बाहेर काढणार असल्याचा इशाराच नाना पटोले यांनी दिला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिद घेऊन घोटाळ्याचे आरोप फेटाळले. उलट चंद्रकांतदादांकडून मला भाजप प्रवेशाची ऑफर होती पण मी ती नाकारल्याने माझ्यावर ईडीच्या धाडी टाकल्या गेल्या, असा गौप्यस्फोट मुश्रीफांनी केला. मुश्रीफांच्या प्रेसनंतर चंद्रकांतदादांनी पत्रकार परिषद घेतली. मुश्रीफांचा दावा खोडून काढताना कायदेशीर लढाईला तयार रहा, असा इशार दिला. तर फक्त आमच्या रडारवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच आहे, असं नाहीय. तर येत्या काही काळात 2 काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, अशी धमकी त्यांनी काँग्रेसला दिला.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार आहे. तसे सुतोवाचच चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपच्या रडारवरील हे दोन नेते कोण? असा सवाल केला जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेल्या आरोपमागे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यानंतर लगेचच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्या आरोपांची हवा काढून घेत त्यांनी मुद्द्यावर बोलण्याचं आवाहन केलं. तसेच अनेकांना असं वाटतं की, घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. दोन काँग्रेसचीही नावे आली आहेत. दोन दिवसात त्यांचेही विषय समोर येतील, असं विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.