‘पवारसाहेब देशाचे नेते’ आमचे नेते होऊच शकत नाहीत! संजय राऊत म्हणतात….
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. शरद पवार आमचे नेते होऊच शकत नाहीत, असं म्हणत त्यांनी पवारांवर निशाणा साधला होता. त्यांच्या विधानावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येणार, याची उत्सुकता होती. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गीतेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, असं म्हणत त्यांनी गीतेंच्या वक्तव्यावर एकप्रकारे नाराजी व्यक्त केली.
आज संजय राऊत यांनी राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. अनंत गीते यांच्या पवारांवरील टीकेवर पत्रकारांनी प्रश्न विचारताच, त्यांनी मला गीतेंचं वक्तव्य माहिती नाही, असं म्हणत त्याच्यावर बोलण्यास टाळाटाळ केली. मात्र पत्रकारांनी याच विषयावर बोलण्याच्या आग्रह धरल्यावर त्यांनी नाराजीच्या सुरातच गीतेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
“महाराष्ट्रातली व्यवस्था ही तीन पक्षांची एकत्र असलेली व्यवस्था आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. शरद पवार असतील, काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे यांनी एकत्र बसून ठरवलंय, सरकार बनवायचं आणि चालवायचं… मला वाटतं हे सरकार 5 वर्ष चालेल आणि या व्यवस्थेला संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आहे”, असं संजय राऊत म्हणाले.