‘आघाडी ही फक्त सत्तेसाठी झालेली तडजोड’, शरद पवार हे शिवसैनिकांचे गुरू होऊ शकत नाहीत!
रायगड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे बोलताना युतीबद्दल सूचक वक्तव्य केल्यानंतर आता इतर नेत्यांनाही बळ आल्याचं दिसत आहे. माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते यांनी रायगडमध्ये केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. ‘शिवसैनिकांनी आघाडीचा विचार करू नये. फक्त आपले घर सांभाळावे,’ असं थेट आवाहन गीते यांनी केलं आहे. ‘आघाडी ही फक्त सत्तेसाठी झालेली तडजोड आहे. शरद पवार हे शिवसैनिकांचे गुरू होऊ शकत नाहीत,’ असंही त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.
रायगड येथे शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. स्थानिक पातळीवर शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये असलेल्या मतभेदांचे प्रतिबिंब त्यांच्या भाषणात पडले. गीते यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट टीका केली. ‘मुख्यमंत्री आपले आहेत म्हणून हे सरकार आपलं म्हणायचं, पण काँग्रेस-राष्ट्रवादी हे काही आपले नाहीत. हे आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची, माझी आणि शिवसैनिकाची जबाबदारी गाव सांभाळण्याची आहे. ते करताना आघाडीचा विचार करायचा नाही. फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे,’ असं गीते यांनी सांगितलं.
‘राज्यातील महाविकास आघाडीत तीन घटक पक्ष आहेत. त्यात दोन काँग्रेस आहेत. एक काँग्रेस आणि दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस. दोन्ही काँग्रेसच. पण हे कधी एकमेकांचं तोंड बघत होते का? ह्याचं एकमेकांचं जमतं का? ह्यांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एका विचाराच्या होऊ शकत नाहीत, तर शिवसेना काँग्रेसच्या विचाराची कदापि होऊ शकत नाही,’ असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
राष्ट्रवादीचा जन्मच खंजीर खुपसून झालाय!
‘राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय. मग आम्ही त्यांच्या विचाराचे कसे होऊ शकतो? आम्ही आघाडी सैनिक नाही, शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार. दुसरा कुठलाही नेता आपला होऊ शकत नाही. त्यांना कितीही उपाध्या मिळो. कोणी त्यांना ‘जाणता राजा’ म्हणो, तो आमचा गुरू होऊ शकत नाही. आमचे गुरू फक्त बाळासाहेब ठाकरे,’ असं गीते म्हणाले.