कोविड काळात सेवा करणाऱ्या आरोग्य सेवकांचा सेवा मित्र मंडळ ट्रस्ट तर्फे धान्यतुला करुन गौरव

पुणे: शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट तर्फे मंदिरासमोर कोविड काळात समाजासाठी कार्य केलेल्या नायडू व ससून रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता, पोस्ट मार्टम विभागातील कर्मचारी व सेवकांची धान्यतुला वाटप करुन गौरव करण्यात आला. तसेच सेवा मित्र मंडळाचे यंदाचे ५६ वे वर्ष आहे. धान्यतुलेतील १७०० किलो धान्य गणेशोत्सव काळात विविध मंडळांची सेवा करणारे मांडव कामगार, स्पिकर व लाईट कामगार, बॅन्डवादक यांना देण्यात आले.
यावेळी यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (निवृत्त) चंद्रशेखर दैठणकर, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनिल रासने, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष जगदीश शेटे आदी उपस्थित होते.
चंद्रशेखर दैठणकर म्हणाले, उत्सव उत्साहात व्हावा, पण गर्दी नको, अशा प्रकारचा गणेशोत्सव यंदा साजरा होत आहे. याप्रमाणेच सर्व गणेशोत्सव मंडळांनी कार्य केले आहे. कोविड काळात नायडू व ससून रुग्णालयातील सेवकांनी अहोरात्र मेहनत घेऊन मोठे कार्य केले असून त्यांचा गौरव होणे गरजेचे आहे.
चारुदत्त आफळे म्हणाले, सेवा मित्र मंडळासारख्या गणेशोत्सव मंडळांचे सामाजिक कार्य सुरु आहे. मात्र, सामान्य व्यक्ती म्हणून त्यामध्ये आपला काय सहभाग आहे, हा विचार करणे गरजेचे आहे. आपणही अशा कार्यामध्ये सहभाग घ्यायला हवा. महेश सूर्यवंशी म्हणाले, लोकमान्य टिळकांचा विचार पुढे नेण्याचे काम सेवा मित्र मंडळ आपल्या कार्यातून करीत आहे. संवेदनशील राहून सामाजिक वसा जपण्याचे काम मंडळ करीत असून ही कौतुकास्पद बाब आहे.