पुण्यातील कॉलेज ‘या’ अटींवर येत्या सोमवारपासून होणार सुरु

पुणे: कोरोना संकट आणि लॉकडाऊमुळे बंद असलेले कॉलेज येत्या सोमवार पासून चालू होणार असल्याची माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.८) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना दिली. तसेच पुण्यातील कोरोना नियम शिथिल करण्यात आल्याची घोषणा सुद्धा पत्रकार परिषेदत करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

दीड वर्षांपासून बंद असलेली पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील वरिष्ठ महाविद्यालयांची दारे आता उघडली जाणार आहेत. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय पुणे जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना लसीकरण १ कोटी नऊ लाखांहून अधिक झाले आहे. तसेच शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये लसीकरण वाढविले जाणार आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यू दर कमी झाला आहे. यामुळे हे निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पवार यांनी शुक्रवारी शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.