राऊतांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

मुंबई: संजय राऊतांनी त्यांच्या पत्नीवर बेहिशोबी मालमत्तेचा आरोप केल्यानं सव्वा रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. राऊत माझे चांगले मित्र असल्याने मानहानीची किंमत थोडी वाढवावी असा मिश्किली चिमटा चंद्रकांत पाटील यांनी काढला आहे. मुंबईतून ते बोलत होते. दरम्यान राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने अर्ज दाखल केला असून संजय उपाध्याय यांना उमेदवारी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले, राजकारणात एकमेकांना बोलावं लागतं. आम्ही एकमेकांना चिमटा काढतो पण किंमत नाही. मी पत्र लिहिलं त्यावरही त्यांनी टीका केली. जेव्हा संधी मिळेल तेव्हा बोलतात. टीका करतात. रोज बोलणारे, लिहिणारे असा पुरस्कार मी संजय राऊतांना देईन. शिवसेनेत इतर नेतेही आहेत पण ते कोणीच बोलत नाहीत. हे मात्र रोज सकाळी येऊन बोलतात. त्यांचा स्टॅमिना इतका आहे की, त्यांना आधी तयारी करावी लागते. रोज हेडलाइन देतात. मात्र हे सगळं असूनही राऊत माझे मित्र असल्यानं मानहानीची किंमत थोडीशी वाढवावी, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. संजय राऊतांना मानलं पाहिजे, पक्षासाठी इतक्या लोकांना अंगावर घेत आहेत. आता त्यांनी मोठी रक्कमेचा दावा केला नाही, कारण त्यांना काळजी असेल उद्या केस हरल्यास ही मोठी रक्कम आणायची कुठून ? असा प्रश्नही त्यांना पडला असेल.
काय म्हणाले आहेत राऊत,
भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी अग्रलेखाला उत्तर दिलेल्या पत्रावर संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रीया दिली आहे. ईडी संदर्भात अग्रलेखावर चंद्रकांत पाटलांनी आम्हाला पत्र पाठवलं, आजच्या अग्रलेखात आम्ही त्यांचं पत्र त्यांच्या टीकेसह छापलं आहे. त्यांच्या या उत्तरासाठी आम्हा आता त्यांना कायदेशीर नोटिस पाठवू, असे राऊत म्हणाले आहेत. यावर चंद्रकांत पाटीलांनीही मिश्कीली प्रतिक्रीया दिली आहे. राऊतांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी, असे पाटील म्हणाले आहेत.