‘महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरे पेटतील’, सामनातून राज्यपालांवर घणाघाती टीका

मुंबई: ठाकरे सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात सातत्याने कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन वाद होत असल्याचं मागील दोन वर्षापासून पाहायला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन विशेष अधिवेशन बोलवावं अशा सूचना राज्य सरकारला केल्या होत्या. ज्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सविस्तर पत्र लिहून राज्यपालांना प्रत्युत्तर दिलं होतं. असं असताना आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून राज्यपालांवर अत्यंत घणाघाती अशी टीका करण्यात आली आहे.
सामनाच्या आजच्या (23 सप्टेंबर) अग्रलेखात राज्यपाल कोश्यारी यांना शिवसेनेकडून थेट इशाराच देण्यात आला आहे. ‘राज्यपाल हे फक्त सरकारी पैशावर पोसले जाणारे पांढरे हत्ती नाहीत. दिल्लीत सत्ता असलेल्या पक्षांची सरकारे ज्या राज्यांमध्ये नाहीत त्या राज्यांत ते मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच ‘रोल’ अदा करतात. पण महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरु नका.’ असं यावेळी म्हटलं आहे.
देशभरातच एकंदरीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बरी नाही. अनेक राज्यांत नक्षलवादी कारवाया वाढल्या असल्याने गृहमंत्री शहा यांना तातडीने मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी लागली आहे. भाजपविरोधात सरकारे ज्या राज्यांत आहेत, तेथे अनेक भाजप पुढारी फक्त चिखलफेक करतात याची बक्षिसी म्हणून ‘झेड प्लस’ दर्जाची केंद्रीय सुरक्षा देण्यात आली आहे. प. बंगाल, महाराष्ट्र वगैरे राज्यांत हे प्रामुख्याने दिसते. ‘सीआरपीएफ’चे शेकडो जवान अशाप्रकारे खास कर्तव्य बजावत आहेत. ही शक्ती राष्ट्रीय सुरक्षेला, जनतेच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध लावणे गरजेचे आहे, पण सध्या आपल्या देशात काही वेगळेच घडताना दिसत आहे. सध्याच्या युगात कावळे मोती खात आहेत व हंस दाणे टिपत आहेत.