प्रभाग रचनेवरुन राज ठाकरे आक्रमक, लोकांनाच कोर्टात जाण्याचं आवाहन

5

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं प्रभाग रचनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असणार आहे. महापालिकेच्या या प्रभाग रचनेवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. राज्य सरकार लोकांना गृहित धरत आहे. माझी विनंती आहे की आता लोकांनीच कोर्टात जावं, असं आवाहनच राज ठाकरे यांनी केलंय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.

कायद्याच्या दृष्टीने पहायचं झालं तर देशात कुठेच अशा पद्धतीने महापालिका निवडणुका लढल्या जात नाहीत. मग हे महाराष्ट्रातच का सुरु झालं, याला कारणं एकच की सत्ता काबीज करणं. आपल्याला हवे तसे प्रभाग रचना करुन पैसे ओतायचे आणि निवडणुका जिंकायचा यासाठी हा प्रयत्न सुरु आहे”, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

या विषयी ५ वर्षांपूर्वीही मी बोललो होतो. २०१२मध्ये जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं, तोपर्यंत एकाच उमेदवाराची व्यवस्था होती. तेव्हा त्यांनी २ उमेदवारांच्या प्रभागाची रचना केली. त्यानंतर भाजपानं ४ उमदवारांचा प्रभाग केला. आता हे सरकार आल्यावर त्यांनी आधी एक प्रभागाची रचना आणली. निवडणूक आयोगानंही एकाच उमेदवाराचा प्रभाग करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर काल यांनी पुन्हा ३ उमेदवारांचे प्रभाग आणले. पण याचा त्रास लोकांनी काय भोगायचा? एका उमेदवाराला मत देण्याऐवजी तीन उमेदवारांना लोकांनी का मत द्यायचं? जनतेला गृहीत धरायचं, हव्या त्या पद्धतीने प्रभाग करायचे. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

यासंदर्भात राज्य सरकारवर टीका करतानाच राज ठाकरेंनी नागरिकांना देखील आवाहन केलं आहे. “माझी जनतेला विनंती आहे की लोकांनी कोर्टात, निवडणूक आयोगाकडे जायला हवं. कोणताही नगरसेवक दुसऱ्याला काम करू देत नाही. एकानं प्रस्ताव टाकला तर दुसरा त्याला विरोध करतो. उद्या लोकांना नगरसेवकाला भेटायचं असेल, तर त्यांनी कोणत्या नगरसेवकाला भेटायचं? निवडणुकीची थट्टा करून ठेवलीये यांनी आणि जनता त्यावर काही बोलत नाही. आम्ही न्यायालयात गेलो तर त्याला राजकीय वास येतो”, असं राज ठाकरे म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.