राज्यात उद्यापासून सुरू होणार कॉलेज; या नियमांचं करावं लागणार पालन

मुंबई: कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने कॉलेज सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार 20 ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून कॉलेज सुरू होणार आहेत. मात्र यासाठी राज्य सरकारने काही नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमांचं पालन करूनच कॉलेज सुरू करता येणार आहेत.

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयाचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या आठवड्यात घेतला. यासाठी मार्गदर्शक नियमावलीही तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे या नियमांचं महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना पालन करावं लागणार आहे.

काय आहेत नियम?

ज्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, ते विद्यार्थी व विद्यार्थिनी विद्यापीठ व महाविद्यालयात होणाऱ्या वर्गांना उपस्थित राहू शकतात. ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख/महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवून लसीकरण पूर्ण करुन घ्यावे.

विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही लसीकरण प्राधान्याने करुन घेण्यात यावे.

विद्यापीठ आणि महाविद्यालयातील वर्ग पूर्ण की 50 टक्के क्षमतेनं सुरु करायचे, याबाबत विद्यापाठ स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय निर्णय घेणार.

ज्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे; अशा ठिकाणी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुनच महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्याचं शासनानं म्हटलं आहे.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थिती पाहून नियमावली बदलण्याचा अधिकारी विद्यापीठं, महाविद्यालयांकडे असेल. परिस्थितीनुसार प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळी नियमावली तयार करायची आहे.

जे विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहू शकणार नाहीत. अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन सोय महाविद्यालयांना करुन द्यावी लागणार.

दोन डोस घेतलेल्या विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी कोरोना नियम पाळणं बंधनकारक.

18 वर्षा खालील विद्यार्थ्यांना लसीकरणाची आवश्यकता नाही.

मुंबई महानगर क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी लोकल ट्रेनने प्रवास करणे सोयीचं असल्यानं विद्यार्थ्यांना प्रवासाची परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभाग मुख्य सचिवांना पाठवणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!