आरोग्य खात्याच्या परीक्षेच्या पेपरफुटीची चौकशी करा, अन्यथा….

मुंबई: आरोग्य खात्यातील परीक्षेचा पेपर फुटल्याने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला घेरलं आहे. या पेपर फुटीप्रकरणाची तातडीने न्यायालयीन चौकशी करा. सोबतच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचीही चौकशी करा, अशी मागणी करतानाच या प्रकरणाची चौकशी नाही झाली तर आम्ही सीबीआयकडे जाऊ, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. आरोग्य मंत्र्यांचा व घोटाळेबाजाचा संबंध नेमका काय आहे? हे जनतेला कळलं पाहिजे. हे प्रकरण म्हणजे सगळी यंत्रणाच पोखरलेली आहे. या गंभीर घोटाळ्याची आरोग्य मंत्र्यांसहीत न्यायलयीन चौकशी झालीच पाहिजे. राज्य सरकारने जर याबाबत टाळाटाळ केली तर आम्हीच हा घोटाळा सीबीआयकडे घेऊन जाऊ, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.

प्रशासनात आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी बसवून त्याच्या मार्फत ब्लॅक लिस्टेट कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती आणि परीक्षे कंत्राटं दिली आहेत. पदभरतीत वसुलीचा घोडेबाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा राखता आली पाहिजे म्हणून हा उपदव्याप होता, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

आरोग्यमंत्र्यांचे हे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळं पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेत. हे सरकार आता अधिकृतरित्या वसुली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेलं आहे. होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत आणि या पेपर फुटीच्या लिंक आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहचल्या आहेत. म्हणजे या सगळ्या घोटाळेबाजीला राज्य सरकारचंच अभय होतं का? असा सवाल उपस्थित होतोय, असंही त्यांनी सांगितलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!