संजय राऊतांनी पोलिसांच्या गराड्यातून बाहेर येऊन बोलून दाखवावे – नितेश राणे

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. महिला अत्याचारावरुन शिवसेनेला  देखील त्यांनी सुनावलं आहे. आपल्या राज्यामध्ये काही लोकांची जीभ जास्त चालायला लागली आहे. संजय राऊत यांनी हिंमत असेल तर त्यांनी आपल्या शब्दावर ठाम रहावं आणि पोलिसांचा गराडा बाजूला करावा, मग जीभ कशी वापरायची हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता त्यांना दाखवेल, असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.

आशिष शेलार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्यातील वादावर देखील नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूला जबाबदार असलेलं चालतं. आशिष शेलारांनी जे कधी म्हंटलच नाही ते या लोकांना चालत नाही. महिलांवरील अत्याचारा बद्दल शिवसेनेला बोलण्याचा अधिकार राहिला आहे का?, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात महिला सर्वात असुरक्षित आहेत. कायदा आणि सुव्यवस्था यांचे धिंडवडे निघाले आहेत.शिवसेनेच्या महिलांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या आपल्या या नेत्यांवर आक्षेप घ्यावा.घाणेरडं राजकारण करून जे बोललं नाही त्या वक्तव्यावर कशाला बोंबाबोंब करताय, असा सवाल देखील नितेश राणे यांनी केला आहे. इंम्पेरिकल डाटा हा राज्य सरकारने तयार करायचा आहे.त्यासाठी 200 ते 300 कोटी हे राज्य सरकारने आपल्या अर्थखात्यातून द्यायचे आहेत.हे पैसे राज्यसरकारने का दिले नाहीत हे ओबीसींचे नेते छगन भुजबळ आणि विजय वडडेट्टीवार यांनी सांगावं. तो डाटा तयार न केल्यामुळे ओबीसी समाजाच्या उमेदवारांवर मोठा अन्याय झाला आहे.मग नेमकं जबाबदार कोण आहे?, असा सवाल नितेश राणेंनी केला.