कंगनाने खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते; रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल
पुणे: देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि प्राणांची आहुती दिलेल्या प्रत्येकाचा हा अपमान आहे. ज्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावे सिनेमा बनवला, पैसे कमावले. त्या खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते, अशी टीका राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अभिनेत्री कंगना राणावतवर केली आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी ट्विट करीत कंगना राणावत हिच्यावर निशाणा साधला आहे. देशाची एकता, अखंडता आणि अस्मिता यामध्ये फूट पाडणाऱ्या कंगना राणावतचा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने काढून घ्यावा आणि तिच्यावर देशाद्रोहाचा गुन्हा दाखल करुन आपण अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालत नाही हे केंद्र सरकारने सिद्ध करावे, अशी मागणी चाकणकर यांनी मोदी सरकारकडे केली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या प्रत्येकाचा हा अपमान आहे. ज्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावे सिनेमा बनवला, पैसे कमावले त्या खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते. 1/2#PadmaAwards2021
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 12, 2021
कंगनाच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिचा निषेध करण्यात येत आहे. तसेच तिला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत अशी देखील मागणी होताना दिसत आहे. भाजपा नेते वरून गांधी यांनी देखील कंगनावर टीका केली आहे. कंगनाने केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की, “कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान होतो, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर होतो, आतातर शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार होतोय. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?”, असा घणाघात त्यांनी केला आहे.