भाजप समर्थकांनी मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला? नवाब मलिकांचा सवाल

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींमुळे भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाला आहे. पंजाब सरकार आणि राज्यातील पोलिसांवर सुरक्षेची जबाबदारी असताना असा हलगर्जीपणा कसा झाला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोदींचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला होता त्याचे व्हीडिओ आणि फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत. यामध्ये आता आणखी एक विडिओ अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पोस्ट करत भाजपवर पलटवार केला आहे. मोदींच्या ताफ्याजवळ भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक कसे पोहोचले असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पंजाबमध्ये सुरक्षेत झालेल्या त्रुटींचा आहे. मोदींचा ताफा शेतकरी आंदोलकांनी एका उड्डाणपुलावर रोखला होता. ताफा जाणूनबुजून रोखण्यात आला असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. मात्र नावब मलिक यांनी ट्विट केलेल्या व्हीडिओमध्ये भाजपचेही समर्थक तिथे घोषणाबाजी करताना दिसत आहेत. मोदींच्या ताफ्याजवळ भाजप समर्थक असल्यामुळे विरोधकांकडून आता भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत भाजपची कोंडी केली आहे. या भाजप समर्थकांनी पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठी हा मोठा धोका होता आणि त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. या व्हीडिओत भाजपचे कार्यकर्ते मोदींच्या गाडीजवळ आहेत. तर आंदोलनकारी शेतकरी मात्र मोदींच्या ताफ्यापासून खूप दूर आहेत. तरीही भाजपकडून खोटे आरोप आणि नाटक करण्यात येत असल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे.