मणीपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 5 जवान शहीद, कमांडिंग ऑफिसरच्या पत्नी, मुलाचाही मृत्यू
मुंबई: आसाम रायफल्सच्या कमांडिंग अधिकाऱ्याला लक्ष्य करत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात 5 जवान शहीद झाले आहेत. तसंच या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसरच्या पत्नी आणि मुलाचाही मृत्यू झाला आहे. मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. जिथे अतिरेक्यांनी आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ला केला आणि आयईडी हल्ला केला. 46 आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांची पत्नी आणि मुलगाही या हल्ल्यात शहीद झाले. कर्नल त्रिपाठी हे छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील रहिवासी होते.
आसाम रायफल्सच्या पथकावर करण्यात आलेल्या या हल्ल्यामागे पिपल्स लिबरेशन आर्मीचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतिरेकी हल्ल्याचा ट्वीट करून निषेध केला आहे. ‘मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या पथकावर करण्यात आलेल्याअतिरेकी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. आज शहीद झालेल्या जवानांना आणि मृत कुटुंबियांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं बलिदान कधीही विसरलं जाणार नाही. त्यांच्या शोक संतप्त कुटुंबीयासोबत माझ्या सहवेदना आहेत’, पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
मणिपूरमध्ये करण्यात आलेल्या या हल्ल्याचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निषेध केला आहे. ‘मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या पथकावर करण्यात आलेला भ्याड हल्ला वेदनादायी आणि निंदनीय आहे. देशाने कमांडिंग ऑफिसर, त्यांच्या कुटुंबातील दोन व्यक्ती, आणि पाच जवान गमावले आहेत’, असं राजनाथ सिंह यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनीही ट्वीट करून अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘आसाम रायफल्स 46 च्या पथकावर भ्याडपणे करण्यात आलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. या घटनेत कमांडिंग ऑफिसर, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीसह काही जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. राज्यातील दल आणि निमलष्करी दलाकडून आधीच अतिरेक्यांविरुद्ध मोहीम सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल’, असं मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी म्हटलं आहे.