स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीचा अपघात

बुलढाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. ते मुंबईला जात असताना बेराळा फाटा (ता. चिखली) येथे त्यांच्या वाहनाला अपघात झाला. ही घटना काल रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. येवता येथून बेराळा येथे जाताना रस्ता ओलांडणारे दोन दुचाकीस्वार रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकले. यात दोघेही दुचाकीस्वार जखमी झालेत. गजानन सोळंकी आणि तुषार परिहार अशी जखमी तरुणांची नावे आहेत.

रविकांत तुपकर यांनी दोन्ही जखमी युवकांना आपल्या वाहनातून चिखली येथील डॉ. महिंद्रे रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर दोन्ही तरुणांना औरंगाबाद येथे नेण्यात आले. स्वतः रविकांत तुपकर जखमी तरुणांना औरंगाबादला घेऊन गेले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईला २४ नोव्हेंबरला बैठक होणार आहे. या बैठकीसाठी रविकांत तुपकर हे सौरभ सावजी यांच्या मालकीच्या असलेल्या इनोव्हा कारने मुंबईकडे निघाले होते. चिखली ते देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्याजवळ दोन तरुण भरधाव बेराळ्याकडे जात होते. रस्ता ओलांडताना दुचाकी तुपकरांच्या वाहनावर धडकली.