नवाब मलिकांचा गौप्यस्फोट; पहिल्या बायकोच्या कुटूंबाला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याची वानखेडेंनी दिली होती धमकी

मुंबई: अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात एक नवीन दावा केला आहे. वानखेडेंनी आपल्या पहिल्या बायकोला सत्य समोर येऊ नये यासाठी धमकी दिली आहे. तिच्या भावालाही बनावट ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आले आहे. समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच नवाब मलिकांच्या नव्या आरोपांमुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

नवाब मलिक म्हणाले की, गंभीर विषय आहे. समीर वानखेडे यांनी पहिल्या बायकोसोबत घटस्फोट घेतला आहे. भांडणे, वाद झाल्यानंतर ती मुलगी समोर येईल आणि सर्व सत्य सांगेल. या भीतीपोटी एका ड्रग्ज पेडलरच्या माध्यमातून त्यांच्या एका भावाकडे ड्रग्ज ठेवण्यात आले. यानंतर राज्य सरकारच्या एजन्सीच्या माध्यमातून त्याला अटक करण्यात आले.

आजही तो मुलगा तुरुंगात आहे. मुलाला खोट्या केसमध्ये अडकवल्यानंतर वानखेडे पहिल्या बायकोच्या कुटुंबाला धमकी देत होते की, जर माझ्याविरोधात बोललात तर संपूर्ण कुटुंबालाच खोट्या ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात टाकेल अशी धमकी वानखेडे यांनी दिली. या कुटुंबावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न समीर वानखेडे यांनी केला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.