अविवाहित लोकांच्या हातात देश; आणि ते लग्नाचं वय ठरवणार; नवाब मलिकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई: सध्या भारतात लग्नासाठी मुलींचं किमान वय १८ वर्षे तर मुलांचं किमान वय २१ वर्षे असावं अशी अट आहे. मात्र, आता मुलींचं वय १८ वरून २१ करण्याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधेयक आणण्याची देखील तयारी केंद्र सरकारने चालवली असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर या मुद्यावरून संमिश्र प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र या मुद्यावरून केंद्र सरकारवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. तसेच, अशा निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
नवाब मलिक यांनी स्त्री-पुरुषांच्या वयामध्ये लग्नासाठी अंतर असायला हवं, असं मत व्यक्त केलं आहे. ‘‘मला वाटत नाही की असं काही करण्याचा निर्णय झाला आहे. १८ वर्षांत मतदानाचा अधिकार आहे. १८ वर्षांत व्यक्तीला सज्ञान म्हणून घोषित केलं जातं. लग्नासाठी महिलांचं वय २१ झालं, तर मग पुरुषांचं वय २५ केलं जाईल का? पती-पत्नीमध्ये वयाचं अंतर असायला हवं’’, असे नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान, देशातल्या प्रत्येक सज्ञान व्यक्तीला विवाहाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं नवाब मलिक यांनी यावेळी नमूद केलं. ‘‘महिलांचं वय २१ झालं, तर मग पुरुषांचं वय २५ केलं जाईल का? आम्हाला वाटतं की जो कुणी सज्ञान व्यक्ती आहे, त्याला आपल्या विवाहाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्याच्या परवानगीशिवाय कोणताही विवाह देशात होऊ शकत नाही. असे तर नाही ना, की लोकांनी लग्नच करू नये, या दिशेने मोदी सरकार देशाला घेऊन जायचा प्रयत्न करतेय? कारण अविवाहित लोकांच्या हातात देश आहे. आणि लग्नाविषयी ते गंभीर नाहीत’’, असे ते यावेळी म्हणाले.