सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से – नवाब मलिक

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक ट्विट केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, असं नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे मलिक यांच्या घरावर तपास यंत्रणांची धाड पडणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, मलिक यांनी अधिक भाष्य न करता फक्त सूचक विधान केलं आहे.

साथियों, सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, असं मलिक यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. माझ्या घरी आज किंवा उद्या सरकारी पाहुणे येणार आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. घाबरणं रोज मेल्यासारखं आहे. आपल्याला घाबरायचं नाही तर लढायचं आहे. गांधीजी गोऱ्यांसोबत लढले होते. आपल्याला चोरांसोबत लढायचं आहे, असं मलिक यांना म्हणायचं आहे. पण त्यांनी सरकारी पाहुणे कोणत्या यंत्रणेचे येणार हे काही स्पष्ट केलं नाही. त्यामुळे मलिक यांच्या या ट्विटवर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपला चांगलंच धारेवर धरलं होतं. ड्रग्ज प्रकरणात तर त्यांनी काही भाजप नेत्यांची नावे घेऊन त्यांना धारेवर धरलं होतं. तसेच मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश करून यंत्रणा कशी भाजपसाठी काम करतेय याची माहिती जनतेसमोर आणली होती. शिवाय मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणाची पोलखोल करताना देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडींवरून भाजपवर सातत्याने निशाणा साधला होता.