राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा धोका निर्माण झाला आहे – नवाब मलिक

मुंबई: या राज्यात कोरोनाच्या केसेसमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होतेय त्यामुळे राज्यात तिसरी लाट येऊ शकते असा धोका निर्माण झाला आहे अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज मिडिया स्टॅण्ड येथे दिली.

बुधवारी झालेल्या कॅबिनेटमध्ये कोरोनाचा आढावा घेत असताना कोरोनाची माहिती देण्यात आली. ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच जगात एक नवीन डेलमायक्रोनचा वायरस आला आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज टास्क फोर्सची बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काही निर्बंध लावायचे असतील तर ते निर्णय आज घेतले जातील. तिसरी लाट जानेवारी ते मेपर्यंत येऊ शकते असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले. तसेच बंगाल, तामिळनाडूची निवडणूक झाल्यानंतर देशात दुसरी लाट आली होती. त्यामुळे हायकोर्टाने तिसरी लाट येऊ शकते म्हणून दोन – तीन महिने निवडणूका पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे.

निवडणूका पुढे ढकलण्याच्या नावाखाली ज्या पाच राज्यात निवडणूका आहेत तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्रसरकार प्रयत्न करुन पंजाबमध्ये सत्ता ताब्यात घेणे त्यांना शक्य होऊ शकतं. निवडणूका पुढे ढकलण्याने वेगळं संकट देशात निर्माण होऊ शकते त्यामुळे काही निर्बंध घालून मर्यादित डोर टू डोर प्रचार, कोरोना नियम पाळून निवडणूका होऊ शकतात यावर केंद्रसरकारने विचार करावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.