संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात; विरोधकांची सरकारला घेरण्याची रणनीती
मुंबई: आजपासून सुरु होत असून पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपुर्वीच तीनही वादग्रस्त कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय. त्यानंतर कॅबिनेटनेही त्याला मंजुरी दिलीय. पण प्रत्यक्षात तीनही कायदे रद्द करणारं विधेयक आजच अधिवेशनात मांडलं जाईल आणि त्यानंतर इतर प्रक्रिया पार पडेल.
विरोधी पक्षही फक्त तीन वादग्रस्त कृषी कायदेच नाही तर एमएसपीचा मुद्दा, महागाई अशा मुद्यावरही सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तसे संकेत विरोधी पक्षांच्या कालच्या बैठकीनंतर मिळालेत. त्यामुळेच मोदी सरकारविरोधात पहिल्या दिवसापासून विरोधी पक्ष आक्रमक होण्याची चिन्हं आहेत.
हिवाळी अधिवेशनचा आजचा पहिला दिवस असेल. पंतप्रधान मोदींनी देशाला तीन कृषी कायदे रद्द करण्याचं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली जाणार आहे. पण विरोधी पक्षाच्या अजेंड्यावर आता मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजेच एमएसपीसाठीचा कायदा आहे. तसच काँग्रेसनं पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरही आवाज उठवण्याची घोषणा केलीय. पण अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांमध्येच फूट पडल्याचही पहायला मिळालं. त्यामुळेच मोदी सरकारविरोधात विरोधकांचा आवाज किती एकजुटपणे उठेल याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय.
विरोधकांच्या अजेंड्यावर महागाई, कोरोना, आणि एमएसपी विधेयक प्रामुख्यानं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांची काल बैठक पार पडली. त्या बैठकीतही याच मुद्यांवरून गरमागरमी पहायला मिळाली. आपच्या संजय सिंग यांनी ही बैठक अर्ध्यावर सोडली. तर टीएमसीचा प्रतिनिधी ह्या बैठकीत आलाच नाही. कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारनं 4 लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणीही विरोधी पक्ष करतायत. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्यासाठीही विरोधी पक्ष आक्रमक होतील.