एलपीजी गॅस सिलेंडर पुन्हा महागले; आता मोजावी लागणार इतकी किंमत

मुंबई: महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यवसायीकांना महागाईचा झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याची अपेक्षा होती, मात्र सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी वाढल्या आहेत. सर्वसामान्यांच्या दृष्टिने दिलासादायक गोष्ट म्हणजे, घरगुती सिलिडंरचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र व्यवसायिक सिलिंडर 100 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. दरम्यान सिलिंडरचे दर वाढल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिलिंडरच्या नव्या दरानुसार आता दिल्लीमध्ये व्यवसायिक सिलेंडर 2100 रुपयांच्या पुढे गेला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज पुन्हा एकदा महिन्याच्या सुरुवातीलाच व्यवसायिक सिलिंडर 100 रुपयांनी महागला आहे. नव्या दरानुसार दिल्लीमध्ये व्यवसायिक सिलिंडरची किंमत 2100 रुपये झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी ती 1733 रुपये इतकी होती. याचाच अर्थ गेल्या साठ दिवसांमध्ये सिलिंडरच्या दरात तब्बल चारशे रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सध्या व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर 2051 रुपयांवर पोहोचले आहेत. कोलकातामध्ये 2174.50 रुपये तर चेन्नईमध्ये 19 किलोच्या गॅस सिलिंडरसाठी  2234 रुपये मोजावे लागणार आहेत.

दरम्यान पुढील काळात पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर कमी होतील असा अंदाज वर्तवला जात होता. ज्याप्रमाणे केंद्राने पेट्रोल, आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून, सर्वसामान्यांना दिलासा दिला. तसाच काहीसा निर्णय गॅस सिलिंडरबाबत देखील होऊ शकतो, अशी अपेक्षा होती. मात्र याउलट गॅस सिलिंडरचे दर आज पुन्हा एकदा शंभर रुपयांनी वाढवण्यात आले आहे. याचा मोठा आर्थिक फटका हा व्यवसायिकांना बसणार असून, यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.