काँग्रेसला बाजू ठेवून पवारांच्या साथीने ममतादीदी सत्तेची मोट बांधतायत; फडणवीसांचा निशाणा

3

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसला बाजूला ठेवून तिसरी आघाडी तयार करायची आहे, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसंच, यांनी कितीही विरोधकांची मोट बांधली तरी २०२४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजपचंच सरकार येणार असा दावा देखील केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

ममता बॅनर्जी यांनी बुधवारी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची मोट बांधत असल्याचं स्पष्ट केलं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. ममता बॅनर्जी काँग्रेसला बाजूला ठेवून काँग्रेसव्यतिरिक्त विरोधी पक्षाची आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवारांची साथ त्यांना आहे दिसतंय, असं फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसने यावर प्रतिक्रिया दिली आहे आमच्या शिवाय हे होऊ शकत नाही. त्यामुळे हा सामना अंतर्गत आहे. सामना पूर्ण झाल्यानंतर आमच्याशी काय लढायचं ते ठरवतील, असं देखील फडणवीस म्हणाले.

भाजपविरोधी पक्षांना एकत्र घेऊन जायचं आहे, असं पवार म्हणतात. पण अंडरलाईन स्टेटमेंट करतात की काँग्रेस सोडून. ममता बॅनर्जी थेट बोलतात आणि पवार बीटविन द लाईन बोलतात. दोघांचं बोलणं एकच आहे. काँग्रेसला बाजूला ठेवायचं आहे आणि इतर पक्ष एकत्र आणायचे आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ममता बॅनर्जी गोव्यात, ईशान्य भागात लढतात का? एवढ्यासाठी की विरोधी पक्ष आम्ही आहोत हे दाखवण्यासाठी… त्यांच्या पक्षाचं वक्तव्य आहे की आम्हीच खरी काँग्रेस आहोत, काँग्रेस संपली आहे. त्या सगळ्या मताला पवारांचं समर्थन आहेच. मात्र, राज्यातली परिस्थिती अनुकूल नाही आहे. त्यांना काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय गत्यंतर नाही आहे, असं देखील फडणवीस म्हणाले. याशिवाय त्यांनी गुप्त बैठका करा, उघड बैठका करा काहीही होणार नाही, २०२४ साली मोदींचंच सरकार येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.