किल्ले रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही; शिवप्रेमींचा आक्रमक पवित्रा

मुंबई: राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या ६ डिसेंबर रोजी रायगड किल्ल्याला भेट देत आहेत. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे हॅलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवले जाणार आहे. मात्र, यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. याचे कारण म्हणजे शिवप्रेमींनी रायगड किल्ल्यावर उतरवण्याला विरोध दर्शवला आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याला आमचा विरोध नाही, मात्र किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिकॉप्टर आम्ही उतरु देणार नाही, असा पवित्रा येथील शिवप्रेमींनी घेतला आहे.

पूर्वी किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिपॅड होते. या ठिकाणी हॅलिकॉप्टर उतरताना किंवा उड्डाण घेताना मोठ्या प्रमाणात धूळ, माती आणि केर-कचरा उडत असे. ही धूळ, माती होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडत असल्याने १९९६ साली येथे उपोषण करून हा हॅलिपॅड येथून काढून टाकण्यात आला होता. सुमारे २५ वर्षांनंतर आता शिवरायांच्या अवमानाचा तोच प्रश्न पुन्हा निर्माण होत आहे, असे शिवप्रेमींना वाटत आहे. म्हणूनच शिवप्रेमींकडून राष्ट्पतींचे हेलिकॉप्टर माळावर उतरवण्याला कडाडून विरोध केला जात आहे.

रायगड किल्ल्यावर एकूण तीन ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. पहिला व मुख्य पुतळा राजसदरेवर मेघडबंरीत विराजमान आहे. तर, दुसरा होळीचा माळ या ठिकाणी आहे. या पुतळ्यासमोर होळीकरिता व दाडंपट्टा चालवणे, तलवारबाजी, तसेच लढाईच्या इतर अभ्यासाकरीता हे मैदान आहे. तर, तिसरा पुतळा हा समाधीच्या ठिकाणी आहे.

या आगोदर देशातील अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी रायगडावर हेलिकॉप्टर उतरविले गेले होते. मात्र त्या त्या वेळी होळीच्या माळावरील पुतळ्यावर मोठ्या प्रमाणावर माती व धुळीचे कण उडाल्यामुळे शिवप्रेमीनी हेलिपॅड उखडून टाकले होते. त्यानतंर आता पुन्हा राष्ट्रपतींकरीता पुन्हा हेलिपॅड बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे शिवप्रेमीनी पुन्हा विरोध केल्याने तणाव निर्माण झाला आहे.