९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन ग्रंथदिंडीच्या अभूतपुर्व सोहळ्याने प्रारंभ!

नाशिक: कडाक्याच्या थंडीत पडलेले धुके रांगोळ्या, झब्बे, साड्या आणि फेट्यांनी साधलेला रंगांचा मेळ…ढोल ताशांचा गजर संबळने धरलेला पारंपरिक ठेका त्याच्या तालावर रंगलेला लेझीमचा खेळ आकाशात उंच उसळणारे ध्वज अशा थाटात ग्रंथदिंडीने 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात आज करत नांदी पेश केली.
पावसानेही उसंत घेऊन जणू काही नाशिककरांच्या उत्साहाला दाद दिली. अधूनमधून पडणारा रिमझिम पाऊस, गोठवणारी थंडी आणि त्यामुळे काहीसे शांत झालेले नाशिक याच्या पार्श्वभूमीवर ग्रंथदिंडी निघेल का? ठरलेल्या मार्गानेच जाईल का? ग्रंथदिंडीत लोक आणि तरुणाई सहभागी होतील का? या सगळ्या शंका काल सकाळी निमाल्या. ग्रंथदिंडीत सहभागी होणारे आणि दिंडीबरोबर चालणारांची एकच गर्दी झाली आणि ते बघून आयोजकांचेही चेहरे फुलले.
या भव्य ग्रंथ दिंडीची सूरूवात कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून झाली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ उपाध्यक्ष तथा कृषीमंत्री दादा भुसे व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते दिंडींचे पुजन करण्यात आले.
ग्रंथदिंडीच्या सर्वात पुढे नटसम्राट नाटक केलेले सोलापूर येथील शेतकरी तथा रंगकर्मी साहित्यिक फुलचंद नागटिळक हे संत गाडगेबाबा यांची वेशभूषा करत हातात खराटा घेऊन रस्त्याची स्वच्छता करित होते. शालेय विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुख्मिणी ,संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई, छत्रपती शिवाजी महाराज, वासुदेव, सावित्री फुले,स्वातंत्र्यवीर सावरकर, म. ज्योतीबा फूले अश्या विविध वेशभूषा साकारल्या होत्या. यावेळी स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर यांच्या पुस्तकांचा देखावा चित्ररथावर साकारण्यात आला होता.
प्रत्येक दिंडीमध्ये विणेकरी असणार्या व्यक्तीला विशेष मान असतो. या दिंडीमध्ये संमेलनाध्यक्ष यांची अनुपस्थिती असल्याने दिंडीची धुरा भुजबळांनीच सांभाळली. कुसुमाग्रज निवासस्थान ते सार्वजनिक वाचनालय नाशिक या दिंडीमार्गावर स्वतः पायी मार्गक्रमण करत पालकमंत्री भुजबळांनी पालकत्वाची भूमिका निभावली. यावेळी ग्रंथ दिंडीत वीणा हातात धरून त्यांनी ठेका देखील धरला. संपूर्ण दिंडीची धुरा त्याच्या खांद्यावर असल्याचे स्पष्ट झाले.यावेळी विधानसभा उपसभापती आ. नरहरी झिरवाळ व आ. हिरामण खोसकर यांनी देखिल टाळवाजवत मृदूंगाच्या गजरात ठेका धरला.