साहित्य संमेलानातील शाई फेकीच्या घटनेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
नाशिक: नाशिकमध्ये सुरु असलेल्या 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी काल गालबोट लागले आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक गिरीश कुबेर यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला असून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल लिहिलेल्या पुस्तकावरून वाद असल्याचं संभाजी ब्रिग्रेडकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाई फेकणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. गिरीश कुबेर यांच्या अंगावर शाई फेकल्यानंतर राज्यात पुन्हा राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कुबेरांवरील हल्ला होणं हे निंदनीय बाब आहे. मी इतिहास तज्ज्ञ नाही. मात्र काही मतमतांतरं असू शकतात आणि ते मांडण्याचं लेेखकाला स्वातंत्र्य असतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण स्विकारलेलं असताना अशाप्रकारचा हल्ला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे, असे मी मानतो. जर कुणाला काही आक्षेपच असेल तर त्यांनी अशाप्रकारचा हल्ला न करता विधायक मार्गाने आपली मतं मांडण्याचा त्यांना अधिकार आहे, असंही पवारांनी सांगितलं. नाशिकमधील मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय घडलं नक्की ?
काल रविवारी दुपारी गिरीश कुबेर यांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजता वृत्तपत्रांचे मनोरंजनीकरण अशा विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी जात असताना कुबेर यांच्यावर शाई फेकल्याचा प्रकार घडला. तर या सर्व प्रकाराची संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक व चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाई फेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले. तर, गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या ‘रेनेसान्स स्टेट – द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ (Renaissance State) या पुस्तकावरून सध्या महाराष्ट्रात बराच वाद सुरु आहे. याच पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने हे कृत्य केले आहे. अनेक राजकीय पक्ष, विविध संघटना, गट आणि लोकांकडून या पुस्तकारावर बंदी आणण्याची मागणी देखील याआधी करण्यात आली होती.
गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर संभाडी ब्रिगेडच्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे गिरीश कुबेर यांच्या अंगावर शाई फेकली असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर कुबेर यांच्या अंगावर शाई फेकून आम्हाला समाधान वाटले आहे. यासाठी आम्ही फासावरही जायला तयार असल्याचे त्या दोघांनी सांगितले आहे.