अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

मुंबई: उदगीर येथे होणाऱ्या नियोजित 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या येथे झालेल्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. हे संमेलन मार्च महिन्यात उदगीरला होणार आहे.

उस्मानाबाद येथे झालेल्या संमेलनात फ्रान्सिस दिब्रिटो आणि नाशिक येथे झालेल्या संमेलनात जयंत नारळीकर यांची निवड झाली होती. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी सक्रिय अध्यक्षाचा आग्रह धरल्यानंतर सासणे यांच्या नावावर सहमती झाली. मराठवाडा साहित्य परिषद आणि उदयगिरी महाविद्यालय या संमेलनाच्या आयोजक संस्था आहेत. याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ यांनीही सासणे यांच्या नावाला पसंती दिली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संमेलन लांबणीवर पडण्याची शक्यता व्‍यक्‍त होत आहे.

भारत जगन्नाथ सासणे यांचा जन्म 27 मार्च 1951 रोजी जालना येथे झाला आहे. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्‌सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी नोकरी केली. 1980 नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत. नव कथेची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यातून आपला वेगळा, स्वतंत्र बाज निर्माण करणारी कथा सासणे यांनी लिहिली.

भारत सासणे यांनी लिहिलेली पुस्तके

अदृष्ट (दीर्घकथा संग्रह), अनर्थ रात्र (दीर्घकथा संग्रह), अस्वस्थ (दीर्घकथा संग्रह), आतंक (दोन अंकी नाटक), आयुष्याची छोटी गोष्ट (कथासंग्रह) , ऐसा दुस्तर संसार (दीर्घकथा संग्रह), कॅंप/बाबींचं दुःख (दीर्घकथा संग्रह), चल रे भोपळ्या/हंडाभर मोहरा (मुलांसाठी दोन नाटिका), चिरदाह (दीर्घकथा संग्रह), जंगलातील दूरचा प्रवास (मुलांसाठी कादंबरी), चिरदाह (दीर्घकथा संग्रह), जॉन आणि अंजिरी पक्षी (लेखकाचा पहिला कथासंग्रह), त्वचा (दीर्घकथा संग्रह), दाट काळा पाऊस (दीर्घकथा), दूर तेव्हा तेथे दूर तेव्हा/सर्प (दोन कादंबरिका)

दोन मित्र (कादंबरी), नैनं दहति पावकः, बंद दरवाजा (कथासंग्रह), मरणरंग (तीन अंकी नाटक), राहीच्या स्वप्नांचा उलगडा (कादंबरी), लाल फुलांचे झाड (कथासंग्रह), वाटा आणि मुक्काम (सहलेखक – आशा बगे, मिलिंद बोकील, सानिया), विस्तीर्ण रात्र (दीर्घकथा संग्रह), शुभ वर्तमान (कथासंग्रह), सटवाईचा लेख (पाच भागात वाटल्या गेलेल्या लेखांचा संग्रह), स्यमंतक मण्याचे प्रकरण (कथासंग्रह), क्षितिजावरची रात्र (दीर्घकथा संग्रह)

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!