मुंबै बँक : प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार, दरेकर मजूर नसल्याचा सहकार विभागाकडून खुलासा

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबै बँकेच्या निवडणुकीमुळे चर्चेत असणारे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सहकार विभागाने मोठा धक्का दिला आहे. प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून सहकार विभागाने अपात्र ठरविले आहे.

प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने मुंबै बँकेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व २१ जागांवर बाजी मारली होती. मुंबै जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही वर्गातून निवडून आले होते. मात्र, सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले आहे. प्रवीण दरेकर १९९७ पासून मुंबै बँकेवर याच प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. ते मुंबै बँकेचे विद्यमान अध्यक्षही आहेत. मात्र, सहकार विभागाने त्यांना मजूर म्हणून अपात्र ठरवल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मुंबै जिल्हा बँकेतील सर्वच्या सर्व २१ जागांवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्त्वाखालील सहकार पॅनलने बाजी मारली होती. १७ जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर चार जागांसाठी निवडणूक पार पडली होती. त्यामुळे यामध्ये काही राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार, का याकडे सर्वांचे लक्ष होते.

या चारही जागांसाठी राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली. या चारही जागांवर सहकार पॅनेलचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आले. यापैकी दोन जागांवर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार उभे होते. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यामुळे मुंबै जिल्हा बँकेवर प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व कायम राहणार होते. परंतु, सहकार विभागाच्या निर्णयामुळे प्रवीण दरेकर यांच्यासमोर अडचणी उभ्या राहणार का, हे पाहावे लागेल.

सहकार विभागाने आपला अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये प्रविण दरेकर यांना आपण मजूर नसाल्याचे सिध्द झाले आहे, यामुळे आता प्रविण दरेकर यांच्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.